उदगीर नगरीत राज्य युवा महोत्सवाचे थाटात उदघाटन

0 12

लातूर दि.30 (जिमाका) : राज्यातील युवकांचा खेळासह, सांस्कृतिक आणि इतर सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासन कटिबद्ध असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून आशियायी स्पर्धेतील सहभागी खेळाडूसह, पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रक्कमेत, तालुका, जिल्हा आणि विभागा पातळीवरच्या क्रीडा संकुलाच्या निधीत मोठी वाढ करण्याचा निर्णय क्रीडा व युवक कल्याण विभागाने घेतला. उदगीर येथे राज्य युवा महोत्सव पार पडत असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 12 जानेवारीला नाशिकला राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करत असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

उदगीर येथे तालुका क्रीडा संकुलावर आयोजित राज्य युवा महोत्सवाचे उदघाटन श्री . बनसोडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार गोविंद केंद्रे, क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके, ऍड. व्यंकट बेंद्रे, प्रशांत पाटील यांच्यासह शिवछत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने आशियायी स्पर्धेतील विजेत्या सुवर्ण पदक विजेत्याला 1 कोटी, रौप्य पदक विजेत्याला 75 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूला 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असून आता आशियायी खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही 10 लाख रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. राष्ट्रीय स्तरावर 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो, तसाच ऑलिम्पिकमध्ये भारताचे नाव उज्वल करणाऱ्या कुस्तीपटू कै. खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्म दिवस राज्याचा क्रीडा दिन आपण घोषित केल्याची माहिती या वेळी श्री. बनसोडे यांनी दिली.

देशात आणि राज्यात खेळाला मोठे प्रोत्साहन दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रातही मोठे बदल घडून आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपला देश जगात खेळाच्या क्षेत्रातही उज्वल कामगिरी करेल. देशातले युवक खेळाकडे आता करियर म्हणून पाहत आहेत हे चित्र खूप आशादायी आहे, असे प्रतिपादन खासदार श्री. शृंगारे यांनी केले.

यावेळी जिल्ह्यातील आणि राज्यातील राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, शिव छत्रपती पुरस्कार विजेते यांचा विशेष गौरव करण्यात आला.

 उदगीरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी

राज्य युवा महोत्सवा मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन एक हजार कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यातील काही गटांनी खुल्या मंचावर आपल्या कलेचे सादरीकरण केले. उदघाटनानंतर इंडियाज गॉट टॅलेंट या प्रसिद्ध शो मधील चमुने सादर केलेल्या नृत्याला उदगीरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन प्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले.

तृणधान्य प्रदर्शनीचे उद्घाटन

जागतिक तृणधान्य वर्षानिमित्त युवकांना अन्नातील पोषणमूल्य कळावे, यासाठी कृषी विभागाकडून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात राज्यातील विविध जिल्ह्यानी सहभाग नोंदविला आहे. त्याचे उदघाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.