पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
सोलापूर, दिनांक 28 (जिमाका):- श्री सिद्धेश्वर महा यात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग 53 वे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी-शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा व यातील अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेऊन त्याचा शेतीमध्ये प्रत्यक्ष वापर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झालेले असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद देवस्थान समितीचे महादेव चाकोते, बाळासाहेब भोंगडे, बसवराज शास्त्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉल्स ना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. स्टॉल वरील विविध तंत्रज्ञान व अद्ययावत तंत्रज्ञाने उत्पादित शेती पिकांची माहिती त्यांनी जाणून घेतली. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील नागरिक व शेतकरी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन येथील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
श्री सिध्देश्वर देवस्थान, सोलापूर, कषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 डिसेंबर 2023 ते दिनांक 1 जानेवारी 2024 या कालावधीत या कषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात कृषीशी संबंधित 350 स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. यामध्ये शेतकरी उत्पादक, महिला बचतगट, कृषीशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञान, कृषी अवजारे विक्रेते कंपन्या यासह विविध स्टॉल्स आहेत. सलग 53 वर्षापासून हे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात असून या प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गावसाने यांनी दिली.
या कृषी प्रदर्शनाला परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी उपसंचालक राजकुमार मोरे यांनी मानले.