खेळाडूंनी देशाचे नाव उज्वल करावे – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार 

0 12

नाशिक, दि. २७ (जिमाका): विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे. खिलाडूवृत्ती जोपासलेली व्यक्ती आयुष्यात कधीच खचून जात नाही तर सातत्याने पुढे जाते. विद्यार्थ्यांनी विविध खेळांतून नवनवीन कौशल्ये व प्राविण्य आत्मसात करावे. यासोबतच सांघिक भावना वृद्धिंगत करून देशाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्‍य व कुटुंब कल्याण, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. येथील गरूड झेप अकॅडमी, दुगाव येथील प्रांगणात आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त नाशिक संदिप गोलाईत, तुषार माळी, सहसंचालक  हितेश विसपुते, उपायुक्त संतोष ठुबे, विनिता सोनवणे यांच्यासह क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, राज्यभरातून आलेले खेळाडू, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनाने खेळांवर विशेष लक्ष दिले आहे. विद्यार्थ्यांचा खेळातील सहभाग वाढावा, उत्तम खेळाडू तयार व्हावेत, राज्यासोबतच देशाचे प्रतिनिधीत्व करून खेळाडूंनी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांतून खेळाडूंनी आपल्या राष्ट्राचे नाव उज्वल करावे हाच यामागील हेतू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही खेलो इंडियाचा मंत्र देवून वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून खेळाडूंचे मनोबल वाढविले आहे. खेळात मेहनत व एकाग्रता हे गुण महत्त्वाचे असून यांचा उपयोग खेळासोबतच अभ्यासातही विद्यार्थ्यांना होतो. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यात जाण्याची संधी मिळते त्यादृष्टीने हिंदी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व विद्यार्थ्यांनी वाढविण्यासोबतच इतर भाषा ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमधून सीबीएससी बोर्डच्या माध्यमातून निश्चितच याकडे लक्ष दिले जात आहेत. स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा झाल्यानंतर नाशिकच्या संस्कृतीचे दर्शन करावे असे सांगुन ‘ना हारना जरुरी है, ना जितना जरूरी है, ये जिंदगी एक खेल है, इसे खेलना जरूरी है’ अशा शब्दात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत शुभेच्छा दिल्या.

अपर आयुक्त श्री. माळी यांनी प्रस्ताविकादरम्यान सांगितले की, 27 ते 29  डिसेंबर या दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी 37 एकलव्य स्कूलमधून 865 मुले व 865 मुली असे सुमारे 1730 विद्यार्थी 10 क्रीडा प्रकारात सहभागी होत असून 3 वेगवेगळ्या मैदानात या स्पर्धा होणार आहेत.

प्रारंभी दीपप्रज्वलन, क्रीडा ज्योत प्रज्वलन व खेलध्वजाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. मंत्री डॉ. पवार यांनी खेळाडूंसह रंगीत फुगे हवेत सोडून राज्यस्तरीय स्पर्धांचे उद्घाटन केले.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.