पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी सहकार्य करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0 15

पुणे दि.२५ – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या ‘मीडिया टॉवर’ या खाजगी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पत्रकारांना स्वस्तातील घरे मिळावीत यासाठी गृहकर्जावरील व्याजावर सवलत देण्याची योजना आणण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन श्री.फडणवीस यांनी यावेळी केले.

हॉटेल जे.डब्ल्यु.मेरिएट येथे आयोजित या कार्यक्रमास पीएमएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, दै.पुढारीचे समूह संपादक डॉ.योगेश जाधव, दै.लोकमतचे संपादक संजय आवटे, दै.सकाळचे संपादक सम्राट फडणीस, भगवती ग्रुपचे बाबासाहेब औटी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते.

नवी दिशा देणारा प्रकल्प पुण्यात उभारला जात असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील इतर शहरात असे प्रकल्प होतांना पहायला मिळतील. पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांची स्वत:ची हक्काची घरे आढळून येत नाही. त्यामुळे मोहिम म्हणून पत्रकारांच्या घराचा प्रकल्प हाती घ्यावा लागेल. माध्यमांची संख्या आणि प्रकार वाढले आहेत. सर्वसामान्य घरातील तरुण-तरुणी या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या जीवनात स्थैर्य येणे ही महत्त्वाची बाब आहे. माध्यमे स्वतंत्र आणि नि:ष्पक्ष राहण्यासाठी माध्यम संस्थेतील शेवटच्या घटकांना सामाजिक सुरक्षा द्यावी लागेल, असे ते म्हणाले.

पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर करण्यात आला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व पत्रकारांना लागू करण्यात आली आहे, त्याची व्याप्ती वाढवून त्यांचे कुटुंबियही या योजनेच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे. म्हाडाच्या लॉटरीतही पत्रकारांना मुंबईत घरे मिळाली. मात्र पत्रकारांच्या वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात ही संख्या कमी आहे. महापालिका आणि पीएमआरडीएने नियमात बसवून घरांची किंमती कमी करण्याबाबत  विचार करावा. मीडिया टॉवरसाठी जागा मिळविणे महत्त्वाची बाब असून महसूली मुख्यालयी असे प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक असल्यास स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येईल.

पुणे येत्या काळात देशातील महत्वाचे औद्योगिक केंद्र असेल

येत्या २० वर्षातील देशाचे ग्रोथ इंजिन होण्याची पुण्याची आणि पीएमआरडीएची क्षमता आहे. नव्या युगाचे उद्योग समाविष्ट करण्याची क्षमता असणारे हे शहर आहे. म्हणून रिंगरोडसारखे विकासाचे प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. पुण्याच्या वेगवान विकासासाठी नवे विमानतळ आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना याबाबतच्या शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यात येईल. विमानतळासाठी जमीन दिलेल्यांना समृद्ध होण्याचा अनुभव होईल, असे पॅकेज देण्यात येईल. पुण्याच्या  विकासासाठी जनआंदोलन उभे राहण्याची गरज आहे. देशाचे येत्या काळातील महत्त्वाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख प्रस्थापित होईल.

यावेळी श्री.जाधव, श्री.आवटे, श्री.फडणीस, श्री.औटी, श्री.भोकरे, श्री. जोशी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.