स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0 5

पुणे, दि. २३ : स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करावे, या मार्गाला केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यावर राज्य शासनाच्या हिश्श्यातील निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मेट्रो मार्ग आणि अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुनील टिंगरे, भीमराव तापकीर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी केंद्र शासन स्तरावर आवश्यक मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल. या मेट्रो मार्गावरील स्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करावी. रामवाडी येथून विमानतळापर्यंत मेट्रो लाईन सुविधा देण्याचा विचार व्हावा.

अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तेथील रस्ते आणि पुलांच्या कामांना गती द्यावी. संगमवाडी ते खराडी रस्त्याचे भूसंपादन करण्याची कार्यवाही लवकर करावी. नगररोड परिसरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. पोलीस विभागाने या भागात वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले, नगर रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची कार्यवाही तातडीने करावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करतांना स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या मार्गाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाकडे विचाराधीन आहे. लवकरच त्यास मान्यता मिळाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाची त्याला मान्यता मिळेल, यानंतर या मार्गावरील काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

000000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.