विभागीय आयुक्तांकडून यवतमाळ जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा
अमरावती, दि. 22 : विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांनी गुरुवारी (21 डिसेंबर) यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाला भेट देऊन मतदार नोंदणी व निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला.
यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार विठ्ठल कुमरे, शिवाजी मगर, स्नेहल देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 जाहीर केला आहे. मतदार यादीच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांची मतदार यादी निरीक्षक नेमणूक केली आहे. त्यानुसार डॉ. पाण्डेय यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदार संघांतर्गत येणाऱ्या दारव्हा उपविभागीय कार्यालयात सभा घेऊन मतदार यादी पुनरिक्षक कार्यक्रमाचा आढावा घेतला. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांच्या हस्ते दारव्हा तहसील कार्यालयातील ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक व प्रसिध्दी केंद्राचे उदघाटनही करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत महाविद्यालयीन विद्यार्थीनींना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनवर मतदानाच्या प्रात्यक्षिकाव्दारे मार्गदर्शनही करण्यात आले.
दिग्रस विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुररिक्षण कार्यक्रमांतर्गत एकूण 4,901 मतदारांची नोंदणी झाली असून त्यापैकी 1,947 महिला मतदारांची नोंदणी झालेली आहे. तसेच अठरा ते एकोनाविस वर्षे वयोगटातील 1,610 पुरुष आणि 1,006 महिला असे एकूण 2,616 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती दारव्हाचे उपविभागीय अधिकारी श्री. खडसे यांनी बैठकीत दिली.
नवीन मतदार अर्ज स्वीकृती तसेच मतदार यादीतून अपात्र मतदार वगळणे, मतदार यादीमध्ये महिला व तरुण मतदारांची संख्या वाढविणे, दिव्यांग मतदारांच्या नावापुढे नोंदणी करणे, स्वीप व ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम आदी उपक्रमांची विभागीय आयुक्तांनी माहिती घेतली. जिल्ह्यात मतदार यादी जनजागृती आणि ईव्हीएम जनजागृतीचे काम चांगले प्रयत्न सुरु असल्याबाबत डॉ. पाण्डेय यांनी समाधान व्यक्त केले.
00000