उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे पुस्तक महोत्सवाला भेट

0 10

पुणे, दि. २२ : पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना देऊन विचार, संस्कृती आणि विज्ञान शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येईल; म्हणून राष्ट्रीय पुस्तक न्यासाने राज्यात विभागनिहाय पुस्तक महोत्सव आयोजित करावा, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आणि महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला दिलेल्या भेटी प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, सुनिल कांबळे, राहुल कुल, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे  संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे उपस्थित होते.

पुस्तके ज्ञान प्रवाह सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य करतात, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, ज्ञान संकुचित ठेवल्यास समाज प्रगती करू शकत नाही. पुस्तकामुळे  विचार आणि व्यक्ती घडतात, व्यक्तीला जीवनाची दिशा सापडते, आपल्या विचारांच्या कक्षा रुंदवतात. पुस्तके आपल्यात सामाजिक जाणिवा निर्माण करतात.

समाजात कोणते साहित्य वाचले जाते यावरून समाजाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. ऐतिहासिक पुस्तकांच्या माध्यमातून आपली स्वतःची ओळख, स्वातंत्र्याचे मोल समजते. त्यामुळे पुस्तके मोलाचा ठेवा आहे. राष्ट्राकडे संपत्तीपेक्षा पुस्तकरूपी विचारांचा खजिना किती मोठा आहे यावरून राष्ट्राचे वैभव ठरते, असे त्यांनी सांगितले.

पुस्तकांच्या रूपाने पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान पोहोचविणारा पुस्तक महोत्सव समाजनिर्मिती आणि राष्ट्रनिर्मितीचे महत्वाचे साधन आहे, असे नमूद करून ते पुढे म्हणाले, पुणेकरांमध्ये ज्ञानसंपादान करण्याची लालसा जास्त असल्याने पुस्तक प्रदर्शनासाठी पुणे हे योग्य ठिकाण आहे, हे महोत्सवातून दिसून आले. विशेषतः तरुणांचा प्रतिसाद वाखाणण्यासारखा आहे. तरुणाई महोत्सवाकडे आकर्षित करणे ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असल्याचे सांगून त्यांनी महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले.

हा देशाचा सर्वश्रेष्ठ पुस्तक महोत्सव असल्याचे नमूद करून श्री.मलिक म्हणाले, दिल्ली वगळता एवढा मोठा पुस्तक महोत्सव कुठेच होत नाही. महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाने चांगले सहकार्य लाभले. लोकसहभागातून भव्य आयोजन शक्य होते हे पुण्याने दाखवून दिले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.पांडे यांनी प्रास्ताविकात पुस्तक महोत्सवाविषयी माहिती दिली. पुस्तक महोत्सवात चार विश्वविक्रम साकारले असून अशा स्वरूपाचा हा एकमात्र पुस्तक महोत्सव आहे. तरुणांनी पुस्तक खरेदीला दिलेला प्रतिसाद हे महोत्सवाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. अशी माहिती त्यांनी दिली. महोत्सवात पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी श्री.फडणवीस यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. त्यांच्या हस्ते ‘पुस्तकवारी’ या वार्तापत्राचे प्रकाशन करण्यात आले. पुणे श्रमिक पत्रकारसंघाच्या पदाधिकारी, बासरीवादक अमर ओक आणि ‘श्रीमंतयोगी’ प्रयोगाचे अभिषेक जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

भारती विद्यापीठाच्या कल्पेश पाटील, संकेत नस्कुलवार, स्वप्नाली बिरुंगी आणि गणेश चव्हाण या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे  व्यंगचित्र रेखाटून त्यांना भेट दिले.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, जगदीश मुळीक, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.