ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अंजली कीर्तने यांच्या निधनाबद्दल मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला शोक
नागपूर, दि. १७: चरित्रकार, संशोधिका आणि लेखिका डॉ. अंजली कीर्तने यांच्या निधनाबद्दल शालेय शिक्षण, मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री दीपक केसरकर यांनी शोक व्यक्त केला आहे.
आपल्या शोक संदेशात श्री. केसरकर म्हणतात, डॉ. कीर्तने यांना लेखन आणि संशोधनाचा वारसा आईकडून मिळाला. संगीत विश्वातदेखील त्या रमल्या. सतारवादनाचे शिक्षण घेतले. नाशिकच्या भोसला मिलटरी स्कूलमध्ये जाऊन त्यांनी घोडेस्वारी, बंदूक चालवण्याचेही शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात कला शाखेत मराठी विषय घेऊन त्या प्रथम आल्या होत्या.
डॉ.कीर्तने यांनी कविता, कथा, ललित लेखन, प्रवासवर्णन, चरित्रात्मक अशा प्रकारांत विपुल लेखन केले. त्यांची डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व, बहुरुपिणी दुर्गा भागवत, दुर्गाबाई रूप शोध, गानयोगी पं द.वि. पलुस्कर, आठवणी प्रवासाच्या, चेरी ब्लोसम, पॅशन फ्लॉवर, माझ्या मनाची रोजनिशी, पाऊलखुणा लघुपटाच्या, लघुपटाची रोजनिशी, कॅलिडोस्कोप, हिरवी गाणी, वेडा मुलगा आणि शहाणी माकडे आदी काही पुस्तके प्रकाशित झाली होती. डॉ. कीर्तने यांनी भारतातील पहिली महिला डॉक्टर डॉ.आनंदीबाई जोशी, संगीताचे सुवर्णयुग, साहित्यिका दुर्गा भागवत या लघुपटांची निर्मिती देखील केली होती.
डॉ.कीर्तने यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना मंत्री श्री.केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
०००