लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

0 14

‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थींशी थेट संवाद

 चिखली येथे विकसित भारत संकल्प यात्रेस लाभार्थी, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन

 जालना, दि. १६ (जिमाका) : केंद्र सरकार हे अनेक लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने प्रभावीपणे राबवित आहे.  ज्या गरजू लाभार्थींना अद्याप या योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा  विविध योजनेस पात्र व्यक्तींना लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सध्या देशभर राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फिरत्या एलईडी वाहनांवरील दूरदृश्यप्रणालीव्दारे विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने  बदनापूर तालुक्यातील चिखली येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. दानवे बोलत होते.

मंचावर आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास लाभार्थी, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मंत्री श्री. दानवे म्हणाले की,  केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जालना जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सध्या सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा 2014 ला केंद्रात निवडून आल्यानंतर त्यांनी आमचे सरकार हे गरीब आणि शेतकरी यांच्यासाठी समर्पित असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर हे सरकार सर्वसामान्य व्यक्ती आणि युवकांच्या कल्याणासाठीही अनेक योजना राबवित आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून या कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेने अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या मार्गदर्शनात  श्री. दानवे यांनी प्रधानमंत्री घरकुल योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र, आयुषमान भारत योजना, गरीब कल्याण योजना, घरकुल योजना, किसान सन्मान योजना, तृणधान्य, महिला आरक्षण,  स्वच्छ भारत अभियान, किसान क्रेडिट कार्ड, किसान सन्मान योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर  आदीबाबत माहिती देऊन कल्याणकारी योजनांचा  लाभ घेण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी डॉ.  श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, केंद्र शासनाच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांचे लाभ वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी  अनेक शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत, वंचित व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा उद्देश हा विकसित भारत संकल्प यात्रेचा आहे. सर्वसामान्यांनी लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन सुखी करावे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी रूपाली निकम यांच्यासह इतर लाभार्थ्यांनी  आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी लाभ घेतलेल्या शासकीय योजनेच्या माध्यमातून आपल्या जीवनात झालेला बदल सांगितला.

कार्यक्रम स्थळी लावण्यात आलेल्या विविध  शासकीय योजनांच्या स्टॉलला मान्यवरांनी भेट दिली.

या ठिकाणी  प्रधानमंत्री  जनऔषधी परियोजना, कृषी, नाबार्ड, महाराष्ट्र बँक (जनधन योजना), उज्वला योजना, आधार नोंदणी/नूतनीकरण, आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत  ( प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ), पशुधन विकास ( पशुधन विषयक किसान क्रेडिट कार्ड), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बचत गट आदी स्टॉल लावण्यात आले होते. स्टॉलला भेट देण्यासाठी उत्स्फूर्त गर्दी  झाली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करून  विकसित भारत संकल्प शपथ घेण्यात आली.

जिल्ह्यातील गावागावात जाऊन  केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिम दि. 26 जानेवारी, 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे.

 ०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.