रे नगर गृह प्रकल्पातील कामाचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा महासंवाद
सोलापूर, दि. १४ (जिमाका): प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत रे नगर येथे ३० हजार घरकुलांचा प्रकल्प उभारला जात आहे. यातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याने येथील कामकाजाचा तसेच पायाभूत सोयी सुविधांचा आढावा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, माजी आमदार नरसय्या आडम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, म्हाडाचे मिलिंद आटकळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. राठोड यांच्यासह संबंधित ठेकेदार अंकुर पेंदे आणि रे नगर हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रे नगर गृहप्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या एसटीपी व डब्ल्युटीपी प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या गृहप्रकल्पांतर्गत ठेकेदाराकडून ज्या पायाभूत सोयी सुविधा देण्यात येत आहेत. तेथील कामकाजाचा आढावा घेऊन ही सर्व कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रे नगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याने उर्वरित सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत. या प्रकल्पाच्या लाभार्थींना बँकांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेली सर्व गृह कर्जे त्वरित देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. जिल्हा आग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व संबंधित बँकर्सना याबाबत स्पष्टपणे निर्देश द्यावेत, असे श्री. राव यांनी सांगितले. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून या ठिकाणी अंगणवाडी व शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा परिषद व महापालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी. वीज वितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठ्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. प्रकल्प अंतर्गत सर्व रस्ते, स्ट्रीट लाईट व ड्रेनेज बाबत कोणतीही तक्रार राहणार नाही याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने रे नगर येथे देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. तर अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे व उपजिल्हाधिकारी उदमले यांनी या प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
०००