विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0 7

ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातांची चौकशी सुरु– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १२ : पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालय येथील ड्रग्ज प्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठातांची चौकशी सुरू असून चौकशीत पुरावे असतील तर बडतर्फाची कारवाई करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषदेत पुणे येथील ससून रुग्णालयाच्या गेटवरून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थ तस्करी प्रकरणी तपासात ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधिकारी यांचा तस्करीत सहभाग असल्याचे अद्यापपर्यंत निष्पन्न झालेले नाही. आरोपीच्या संरक्षण कामी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याने दोन पोलीस अधिकारी व दोन कर्मचारी यांना बडतर्फ केले असून सहा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.

ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्याकडून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवले जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला असून ससून रुग्णालयाच्या गेटवरून २ कोटी १४ लाखांचे मेफेड्रॉन हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. अशा प्रकारच्या कारवाया राज्यात करण्यात येत आहेत. त्यामध्ये विविध घटना उघडकीस येत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील काही भागात बंद असलेल्या कंपन्यांमध्ये ड्रग्ज तयार करण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे संशयित हालचाली होत असलेल्या राज्यातील बंद कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पुणे अधिष्ठाता डॉ. ठाकूर  यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ललित पाटील विविध व्याधीने ग्रस्त होता. त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका अशा स्वरूपाची धमकी ससूनचे अधिष्ठाता यांनी तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दिल्याची तक्रार आली नसल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थ तस्करी हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असून याचे पुरावेही सापडले आहेत. इतर राज्याच्या समन्वयाने कारवाई करण्यात येत आहे. हुक्का पार्लर बंद करण्यात आले आहेत. संशयास्पद व्यक्ती व आरोपींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नार्को टेस्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

सर्व सदस्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या प्रकरणातील कोणासही पाठिशी घातले जाणार नाही. भावी पिढीचे भवितव्य महत्त्वाचे असल्याने सरकार ही लढाई लढत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.

या प्रश्नांच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सचिन अहीर, भाई जगताप, राजहंस सिंह, अनिल परब,  अरुण लाड यांनी सहभाग घेतला.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.