‘लोकराज्य’ : शासन आणि जनतेला जोडणारा दुवा – उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे
नागपूर, दि.११ : ‘लोकराज्य‘ हे मासिक शासन आणि जनतेला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून सर्वसामान्यांनी शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी लोकराज्य मासिकाचे नियमित वाचन करण्याचे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.
विधानभवन परिसरातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ अंकाच्या प्रदर्शनाला उपसभापती गोऱ्हे यांनी आज भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
अनेक मान्यवर व सामाजिक धुरिणांद्वारे विविध विषयांवर लोकराज्यमधून सातत्याने माहिती प्रसृत होत असते. त्यामुळे लोकराज्यचे अंक विधान परिषद सदस्य म्हणून मला महत्त्वाचे वाटत असल्याचे श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या. प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनात प्रकाशित होत असलेले लोकराज्य मासिक https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गावागातील सरपंच, ग्रमापंचायत सदस्य, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती मिळविण्यासाठी या संकेतस्थळावर लोकराज्यचे वाचन करण्याचे व सर्वसामान्य नारिकांना त्याबाबत अवगत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपसभापती गोऱ्हे यांचे लोकराज्यचा अंक भेट देवून स्वागत करण्यात आले. तर श्रीमती गोऱ्हे यांनी देखील ‘ऐसपैस गप्पा नीलमताईंशी‘ हे पुस्तक माहिती अधिकारी गजानन जाधव यांना भेट दिले.
०००