राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे उदगीरमध्ये शानदार उद्घाटन
विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलाच्या निधीमध्ये केली भरीव वाढ
लातूर दि.10 ( जिमाका ) राज्यात खेळ संस्कृती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने आशियायी स्पर्धेतील विजेत्या सुवर्ण पदक विजेत्याला 1 कोटी, रौप्य पदक विजेत्याला 75 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूला 50 लाख रुपये देण्याचा निर्णय झाला असून आता आशियायी खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही 10 लाख रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
उदगीर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर( तालुका क्रीडा संकुल )क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव डॉ. हनुमंत लुंगे, जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश साकोळकर, उदगीर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, यांच्यासह विविध स्पर्धा असोसिएशनचे पदाधिकारी, आठ प्रादेशिक विभागाचे खेळाडू, प्रशिक्षक यांच्यासह क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
राज्याचा क्रीडामंत्री होऊन चार महिने झाले आहेत, या काळात आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने अनेक महत्वाचे निर्णय घेतले असल्याचे सांगून त्यात विभागीय क्रीडा संकुलासाठी 75 कोटी रुपये, जिल्हा क्रीडा संकुलासाठी 50 कोटी रुपये, तालुका स्तरावरील क्रीडा संकुलासाठी 10 कोटी तर ग्रामपंचायत स्तरावर पूर्वी 7 लाख होते ते आता 14 लाख रुपये केल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी सांगितले.
उदगीर मध्ये रुजवायची आहे खेळ संस्कृती
उदगीर, जळकोट भागात खेळ संस्कृती रुजविण्यासाठी मोठे क्रीडा संकुल उभी करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या पटांगणावर ( तालुका क्रीडा संकुल ) 9 कोटी रुपये एवढ्या निधीतून मिनी स्टेडियम उभं करत आहोत. येत्या काळात अनेक राज्यस्तरीय खेळाचे आयोजन उदगीर मध्ये केले जाणार आहे. अधिकाधिक शाळा, महाविद्यालयातील युवक, युवतीनीं खेळात प्राविण्य मिळवावे. खेळात करियर करून या भागाचे क्रीडा नैपुण्य वाढवावे असे आवाहन करून क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडुंचे, प्रशिक्षकांचे उदगीर नगरीत स्वागत केले.
या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, लातूर अशा एकुण ८ विभागातून १७/१९ वर्षाआतील मुले १६० व मुली १६० असे एकुण ३२०, खेळाडू आणि ३२ क्रीडा मार्गदर्शक / संघ व्यवस्थापक सहभागी झाले आहेत. तसेच राष्ट्रीय संघाच्या निवड चाचणी करीता प्रत्येक विभागामधून ५ खेळाडू निवड चाचणी करीता असे एकूण ५१२ खेळाडू सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाच्या प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जनन्नाथ लकडे यांनी केले. राज्य डॉसबॉल असोसिएशनचे महासचिव प्राचार्य हनुमंत लुंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाने झाले स्पर्धेचे उदघाटन
डॉसबॉल स्पर्धेचे उदघाटन लेझिमच्या तालावर वंदन करून झाले. अत्यंत आकर्षक डॉसबॉल नृत्यही युवक युवतींने केले. त्याचबरोबर सर्व प्रकारचे खेळ, धाडसी खेळ याचे प्रात्यक्षिक नृत्यातून सादर केले. हा सोहळा अत्यंत स्पर्धेचा उत्साह वाढविणारा ठरला.
००००००