विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृश्य संवादाने काल्हेर ग्रामस्थ झाले प्रेरित

0 4

ठाणे, दि.9(जिमाका)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन हे सर्वसामान्यांकरिता काम करणारे शासन आहे.  विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक गरजू लाभार्थ्याचा शोध घेतला जात आहे. त्याला योजना समजावून सांगितली जात आहे आणि त्याचा प्रत्यक्ष लाभही दिला जात आहे. यामुळे लाभार्थ्यांना होणारा त्रास आता होत नाही. यातून एक बाब निश्चितपणे सिद्ध झाली आहे की, हे शासन केवळ घोषणा करणारे नसून थेट कामच करणारे शासन आहे, असे प्रतिपादन राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत येथे आयोजित “विकसित भारत संकल्प यात्रा” व “मा.पंतप्रधान महोदयांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी थेट संवाद” या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री श्री.कपिल पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, प्रकल्प संचालक डॉ.छायादेवी शिसोदे, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, दूरदर्शन संचालक सिद्धार्थ बोडके, तहसिलदार अधिक पाटील, जि.प.महिला व बाल विकास अधिकारी संजय बागूल, आरोग्य संचालनालयाचे सहायक संचालक डॉ.चाकूरकर, केंद्रीय संचार ब्युरो, पुणेचे प्रबंधक डॉ.जितेंद्र पानपाटील, गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे,  स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले, देशातील सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ थेट पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “विकसित भारत संकल्प यात्रा” ही संकल्पना राबविण्याचा निश्चय केला आहे. त्यादृष्टीने देशभरात एक चैतन्याचे वातावरण बनले आहे. या संकल्पनेवर आधारित “शासन आपल्या दारी” ही संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहत राबविली जात आहे. आतापर्यंत जवळपास एक कोटी 75 लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात शासन यशस्वी झाले आहे.

पालकमंत्री श्री.देसाई यांनी या कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरित्या केल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल व अन्य संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळून देण्याच्या कामातील स्पर्धा सुदृढ होण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला शुभेच्छा दिल्या व शेवटी सर्वांना आश्वस्त केले की, कोणत्याही शासकीय योजनेत सुसूत्रता आणण्यासाठी आवश्यकता असल्यास त्या योजनेच्या अटी, नियम, शर्तींमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी शासन स्तरावर नक्कीच प्रयत्न केले जातील.

विकसित भारत संकल्प यात्रा” सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणारकेंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “विकसित भारत संकल्प यात्रे” चे आयोजन संपूर्ण भारतात करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लाभार्थ्याचा शोध घेणे, त्याला योजनांची माहिती देणे, त्याला प्रत्यक्ष लाभ तात्काळ देणे, या प्रकारचे काम सुरू आहे. लोकांच्या अपेक्षापूर्तीसाठी शासन आणि शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्नशील आहे. जनतेने गेल्या साडेनऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य नागरिकांरिता ज्या पद्धतीने काम करून दाखविले आहे यातूनच त्यांची देशवासियांप्रति असलेली निष्ठा, तळमळ दिसून येते. हे शासन गरिबांसाठी, गरजूंसाठी समर्पित असून त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. यातून संपूर्ण भारतवासियांमध्ये “आपला भारत देश महासत्ता बनणारच” हा विश्वास जागृत झाला आहे. याचबरोबर श्री.पाटील यांनी यावेळी दि.1 जानेवारी 2024 पासून ठाणे जिल्ह्यातील 452 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याची घोषणा केली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी महोदयांनी मंत्री महोदयांना आश्वस्त केले की, जिल्हा प्रशासनातील प्रत्येक शासकीय विभाग “विकसित भारत संकल्प यात्रे”च्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्या लाभार्थ्यांना आवश्यक तो शासकीय योजनेचा लाभ देईल. या कामात ठाणे जिल्हा अग्रेसर राहील.

          या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री.प्रमोद काळे यांनी विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवंडी पंचायत समितीचे विषय तज्ञ डॉ. विनायक पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धनके यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी विकसित भारत संकल्पनेबाबतची  सामूहिक शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमस्थळी  स्टेट बँक ऑफ इंडिया-अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, सही पोषण देश रोशन, आरोग्य विभाग-आयुष्यमान भारत योजना, क्रीडा-बॅडमिंटन प्रशिक्षण, प्रधानमंत्री आवास योजना, आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर, ड्रोनद्वारे किटकनाशक फवारणी प्रात्यक्षिक या विषयांबाबतचे स्टॉल उभारण्यात आले होते. या ठिकाणी लाभार्थ्यांची नोंदणी देखील करण्यात येत होती.

विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दूरदृश्य संवादाने काल्हेर ग्रामस्थ झाले प्रेरित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या देशभरातील कनार्टक, गुजरात, चंदीगड, जम्मू-काश्मीर, बिहार, झारखंड अशा  विविध राज्यातील लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीव्दारे थेट संवाद साधला. श्री.मोदी यांनी या संवादातून शासनाच्या विविध योजना व योजनांचे लाभ याविषयी लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष अनुभव जाणून घेतले. संपूर्ण देशातील नागरिक ‘विकसित भारत संकल्प यात्रे’शी जोडले गेले आहेत. ‘विकसित भारत’ हा संकल्प सत्यात आणण्यासाठी प्रत्येक भारतीय मनापासून प्रयत्न करताना दिसत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ वंचितांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. काल्हेर ग्रामस्थ प्रधानमंत्र्यांच्या या संवादामुळे प्रेरित झाल्याचे चित्र दिसत होते.

000000

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.