मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड २०२३ चे वितरण
कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
मुंबई, दि.9 सामाजिक जबाबदारी कायदेशीररित्या बंधनकारक असलेल्या कोणत्याही कर भरण्यापेक्षा वेगळी आहे. जेव्हा आपण कोणताही कर भरतो तेव्हा समाज आपल्याशी जोडला जात नाही.देशाच्या, समाजाच्या कल्याणासाठी मदत करतो तेव्हा अनेक व्यक्ती, समाज आपल्याशी जोडला जातो. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डस् वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, द सीएसआर जर्नल एक्सलन्सचे अमित उपाध्याय, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास,माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री. सिंह म्हणाले, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. परस्पर अवलंबिताची बंधने तोडून राहू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अडचणीवेळी मदत केली तर मदत करणाऱ्या व्यक्तीकडे किती संपत्ती आहे हे पहिले जात नाही. तर कोणत्या व्यक्तीने तातडीने मदत केली हेच पाहिले जाते. समाजात बंधुत्वाची,आणि मदतीची भावना असायला हवी जो समाज एकमेकांना मदत करतो तोच समाज देशाला पुढे घेऊन जातो आणि इतरांना पुढे येण्यासाठी सुद्धा प्रेरित करतो.त्यासाठी सामाजिक जाणीव असलेल्या लोकांचे, विशेषत: कॉर्पोरेट्स क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांच्या सामजिक योगदानाबद्दल कौतुकच केले पाहिजे असेही केंद्रीय मंत्री श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.
सामाजिक विकासासाठी उत्तरदायित्व सांभाळणाऱ्या संस्थाचे महत्त्वपूर्ण योगदान -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एक दुसऱ्याला मदत करणे ही आपली परंपरा आहे. दान धर्म ही आपली संस्कृती आहे. समाजासाठी काम करणे हे आपले कर्तव्य व उत्तरदायित्व आहे. सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक संस्था आणि कंपन्या शासनासमवेत काम करीत आहेत. उत्तरदायित्व सांभाळणाऱ्या संस्थाचे सामाजिक विकासामध्ये महत्वापूर्ण योगदान ही अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत देशात मोठ्याप्रमाणात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि कंपन्या आहेत. शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याण, पर्यावरण, कृषी, ग्रामीण विकास,आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान आज करण्यात येत आहे.
सांस्कृतीकार्य मंत्री मुनगंटीवार यांनी वने, आणि मत्स्यव्यवसाय या क्षेत्रात विविध योजना राबवून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. लंडन येथील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत आणण्याचा सामंजस्य करार केला. हजारो झाडांची लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला त्यांना आज गुड गव्हर्नन्स या पुरस्कारानी सन्मानित करण्यात येत आहे. त्याबद्दल अभिनंदन करून खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांना एंबेसडर फॉर सोशल इम्पॅक्ट हा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल मला वडील म्हणून अभिमान आहे. असे सांगून दुर्गम भागात आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी सामजिक कार्य करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्व देशांसोबत दृढ संबंध तयार झाले आहेत. पाच ट्रिलियन डॉलर्सची भारतीय अर्थव्यवस्था बनवण्यासाठी गतीने काम करीत आहोत. यामध्ये राज्याचा वाटा एक ट्रिलियन डॉलर्स असण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. यावर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गच्या विजयी भूमीवर नौदल दिन साजरा केला हा अभूतपूर्व क्षण होता. प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करणारा क्षण होता.असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंत्री सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीकांत शिंदे, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. भास्कर चटर्जी, आयकर आयुक्त विकास अग्रवाल, सहआयुक्त निधी चौधरी, सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, माजी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस सहारिया, माजी सनदी अधिकारी दीपक सानन,माजी सनदी अधिकारी अजितकुमार जैन, एबीपी माझा मुख्य संपादक राजीव खांडेकर, आयकर विभागाचे आयुक्त सुमित कुमार,एनआरएलएम मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना झा त्रिपाठी, माजी सनदी अधिकारी डॉ. प्रदीप व्यास, टाटा सामाजिक विज्ञान संस्थांचे प्र-कुलगुरू बिना पॉल,इरा खान,सुहानी शहा या मान्यवरांना शिक्षण, कौशल्य विकास व प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण, बाल कल्याण, सायबर सुरक्षा, पर्यावरण, कृषी, ग्रामीण विकास, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या अधिकाऱ्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.तसेच मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते दुर्गम भागात आदिवासी समाजाच्या कल्याणासाठीकाम करणाऱ्या सामजिक करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी अभिनेता अमीर खान, सुहानी शहा विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर उपस्थित होते.
00000