मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणास वेग द्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
नागपूर, दि. ७ : अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे उभारण्यात येणार्या मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी येथे आज येथे दिले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरिस कॉलेज) येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विभागीय उपायुक्त गजेंद्र बावणे, रिद्धपूर येथील महंत कारंजेकर बाबा, महंत वाईनदेशकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, सहसचिव प्रताप लुबाळ, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक प्रकाश बच्छाव, डॉ. उमेश काकडे, संतोष चव्हाण, प्रशासन अधिकारी डॉ. प्रभू दवणे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. तिचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने समिती गठित केली. त्या समितीने अहवाल सादर केला आहे. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील याचाही विचार करण्यात आला आहे.
मराठी भाषा विद्यापीठासाठी जागा अधिग्रहण करण्याबाबत नियम व अटी तपासून उपविभागीय अधिकारी यांनी तातडीने अहवाल सादर करावा. आणि ही जागा अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांना अवगत करावे, असे निर्देशही श्री. पाटील यांनी यावेळी दिले.
महानुभाव गोविंदप्रभू तीर्थस्थान सेवा समिती रिद्धपूर (जि.अमरावती) यांच्या जागेत (कॅम्पस) मध्ये जून २०२४ पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याबाबत ही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.