‘कळमना किराणा मार्केट यार्ड’ हे देशातील सर्वात सुंदर मार्केट यार्ड ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0 14

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कळमना किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन

नागपूर ,दि. 3 :  व्यापारी व ग्राहकांसाठी विविध सुविधांचा समावेश करून तयार होणारे कळमना किराणा मार्केट यार्ड हे देशातील सर्वात सुंदर किराणा मार्केट यार्ड ठरेल व येथील किराणा व्यावसायिकांचा चौपट फायदा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

 दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनच्यावतीने येथील कळमना मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात येणाऱ्या  किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी  श्री. फडणवीस बोलत होते. आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूर सुधार प्रन्यासचे(नासुप्र) सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवप्रताप सिंह आदी यावेळी  उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, शहराच्या इतवारी भागात गजबजलेल्या जागेत असलेल्या किराणा बाजाराचा विस्तार करण्याच्या चर्चा बऱ्याच वर्षांपासून सुरु होत्या. मात्र, या संदर्भात ठोस असे काही घडत नव्हते. या किराणा बाजाराच्या स्थानांतरासाठी विविध ठिकाणांच्या नावाची चर्चा होत राहिली. मात्र, ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी किराणा मार्केट यार्डची  संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रम घेतले आणि  किराणा मर्चंट असोसिएशनने  त्यास चांगला प्रतिसाद दिला. परिणामी, येत्या काळात किराणा मार्केट यार्ड प्रत्यक्षात उभारले जाणार आहे. नासूप्रने  या प्रकल्पासाठी  जमीन उपलब्ध करून दिली असून वीरेंद्र खरे यांनी यार्डचा उत्तम प्लॅन तयार केला हेही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

किराणा मर्चंट असोसिएशनने नागपुरच्या सामाजिक व राजकीय जीवनात महत्त्वाचे योगदान दिले आहे. असोसिएशनच्या माध्यमातून इतवारी भागातील किराणा बाजार या मार्केट यार्डमध्ये पूर्णपणे स्थानांतरित होईल आणि  कमीत-कमी वेळात या मार्केट यार्डचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मार्केट यार्डच्या विकासासाठी आवश्यक ती मदत राज्य शासनाच्यावतीने करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

******

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.