महापरिनिर्वाण दिनासाठी अनुयायांच्या सोयी-सुविधांचे काटेकोर नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. २९ :- ‘महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे,’ असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने दादर चैत्यभूमी, आणि मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत विविध स्थळांच्या ठिकाणी दर्शन व्यवस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील मध्यवर्ती व्यवस्था याठिकाणी जय्यत सुरू आहे. या तयारीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, अविनाश महातेकर, रामभाऊ पंडागळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आए.एस. चहल, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. एच. के. गोविंदराज, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे तसेच शासनाचे विविध विभाग, मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, भिक्खू संघ आणि महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गतवर्षी लाखो अनुयायी आले होते. त्यांची मुंबई महापालिका आणि सर्वच यंत्रणांनी उत्तम व्यवस्था केली होती. यंदाही आवश्यकता वाटल्यास आणि गतवर्षीच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करून जास्तीत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. बेस्ट, एसटी यांची परिवहन व्यवस्था, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तसेच पोलीस बंदोबस्त याबाबत चोख नियोजन करण्यात यावे. आरोग्य आणि स्वच्छता, साफ- सफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडली पाहिजे, यांची दक्षता घेण्यात यावी. अनुयायींची भोजन, निवास आणि आरोग्य सुविधा याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या.
पालकमंत्री श्री. केसरकर यांनीही स्वच्छताविषयक तसेच निवास आदींबाबत सूचना केल्या.
बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, महापरिनिर्वाण दिन मानवंदना शासकीय कार्यक्रम, पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, “लोकराज्य” चा विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिध्दी याबाबत चर्चा झाली व निर्देश देण्यात आले.
मुंबई महापालिका महापरिनिर्वाण दिनाची विशेष माहिती पुस्तिका काढत आहे . यंदा या पुस्तिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिकस्तरावरील विशेष कार्य या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती संकलित केल्याची माहिती समितीचे सरचिटणीस कांबळे यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागाच्यावतीनेही नियोजनाची माहिती देण्यात आली. महापरिनिर्वाण दिन समितीचे पदाधिकारी आदींनीही विविध सूचना केल्या.
000