बृहन्मुंबईतील वाहनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ

0 5

मुंबई, दि. 28 : केंद्र शासन पुरस्कृत योजनांची परिपूर्णता साध्य करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे राज्यात आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा महानगरपालिकांची निवड करण्यात आली असून, बृहन्मुंबईसाठीच्या यात्रेतील चार वाहनांचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मंत्रालय परिसरात आज करण्यात आला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील विविध 227 ठिकाणांवर ही चार वाहने फिरणार असून विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणे व त्याबाबत जागृती करणे, शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, निश्चित केलेल्या पात्रतेनुसार संभाव्य लाभार्थी यांची यात्रेमध्ये नोंदणी करणे आदी या यात्रेची उद्दिष्टे आहेत. या यात्रेदरम्यान विविध योजनांचे लाभार्थी या वाहनांना भेट देऊन थेट लाभ घेऊ शकतात.

आयुष्मान हेल्थ कार्ड, उज्ज्वला योजना, पीएम स्वनिधी योजना, आधार कार्ड आदी विविध योजनांचा या यात्रेअंतर्गत समावेश करण्यात येत आहे. या महत्वाकांक्षी योजना समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी, योजनांबाबतची जनजागृती करून योजनेची परिपूर्णता साध्य करण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपयुक्त ठरणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही यात्रा राज्यातील एकूण 418 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थातील 2084 परिसरातून फिरणार आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या दहा महानगरपालिकांची निवड करण्यात आली आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.