जिजामाता नगरातील रहिवाशांना दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

0 4

मुंबई, दि. 21 : लोकांचे हित जपण्यास शासनाचे प्राधान्य आहे. काळाचौकी परिसरातील जिजामाता नगरमधील रहिवाशांना दर्जेदार घरे उपलब्ध करून द्यावीत. परिसरातील पुनर्वसन प्रकल्प येत्या सहा वर्षात पूर्ण करावा. हा प्रकल्प पूर्ण करताना रहिवाशांचे समाधान होईल असे पहावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या.

जिजामाता नगर परिसरातील रहिवाशांच्या प्रश्नांबाबत मंत्रालय येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे यांच्यासह विकासक शांति ओम रेसिडेन्सीचे सर्व संचालक, रहिवासी उपस्थित होते.

विकासकाने रहिवासी व सोसायटी यांच्यासोबत नव्याने विकास करार करावा अशा सूचना देऊन पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, या नवीन करारामध्ये रहिवाशांना नवीन सदनिका देण्याचा कालावधी, देण्यात येणाऱ्या सुविधा यासह भाड्याची रक्कम, काम पूर्ण करण्याचे वेळापत्रक व काम पूर्ण न करता आल्यास त्यासंदर्भातील कार्यवाही शासकीय यंत्रणांमार्फत करण्याच्या अटींचा समावेश करावा. आतापर्यंतचे महापालिकेचे सर्व कर विकासकाने तातडीने भरावेत. काम पूर्ण करण्याचा संपूर्ण आराखडा सादर करावा. सादर केलेल्या आराखड्याप्रमाणे काम न झाल्यास विकासकाकडून काम काढून संबंधित यंत्रणेमार्फत ते पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, दिलेली घरे चांगल्या दर्जाची असावीत. यासाठी विकासकाने दर्जेदार काम करावे. वेळापत्रकानुसार काम करतानाच येत्या सहा वर्षांमध्ये संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईल याची विकासकाने काळजी घ्यावी. तसेच रहिवाशांना नेमके काय – काय मिळणार आहे हे सांगावे. रहिवाशांच्या संमतीने प्रकल्प व्यवस्थापन समिती नेमावी. लोकांचे समाधान महत्वाचे आहे. त्यादृष्टीने विकासकाने कामाची सुरुवात करावी. लोकांनीही स्वतःचे हित जाणून सहकार्य करावे, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी जिजामाता नगर पुनर्वसन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच रहिवाशांचे प्रश्नही समजून घेतले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/ससं/

 

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.