बालकांचे हक्क, सुरक्षेवर भर देणारे ‘बाल धोरण’ आखणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. २० : चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी करणार तसेच बालकांच्या हक्क आणि सुरक्षेवर भर देणारे ‘बाल धोरण’ राज्यात तयार करण्यात येत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
कुलाबा येथील बेस्ट भवन येथे ‘अर्पण’ स्वयंसेवी संस्था आणि बेस्टच्या माध्यमातून १८ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ‘बालकांचे हक्क व सुरक्षितता अभियान’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल, अर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरीया उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, आपल्या रोजच्या प्रवासादरम्यान बालकांना येणारे वाईट अनुभव कसे टाळता येवू शकतात यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था हा जनजागृतीपर चांगला उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमातून लहान मुलांना चांगले आणि वाईट स्पर्श याची माहिती द्यावी. बेस्ट बरोबर परिवहन विभाग, शिक्षण विभागामार्फत बालकांचे हक्क आणि सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवावे. बालकांना लहानपणापासूनच लैंगिक शिक्षणासंदर्भात माहिती झाली, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर उद्याची चांगली पिढी निर्माण होऊ शकेल. आम्ही नागरिकांसाठी मुंबईची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहोत. हा उपक्रम म्हणजे आमच्या मुलांचे सुरक्षित भविष्य संरक्षित करण्याच्या आमच्या सामूहिक बांधिलकीची साक्ष आहे असेही मंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.
महाव्यवस्थापक विजय सिंगल म्हणाले की, बेस्ट बसमधील प्रवास सर्वांसाठी, विशेषतः आमच्या सर्वात छोट्या प्रवाश्यांसाठी सुरक्षित अनुभव देण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. अर्पण सोबत, आम्ही जागरूकता वाढवण्यासाठी, कर्मचाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी आणि शहरातील मुलांच्या कल्याणासाठी योगदान देण्यासाठी काम करत राहू अशी ग्वाही श्री. सिंगल यांनी दिली.”
अर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरीया यांनी बेस्टच्या माध्यमातून 18 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत बालकांचे हक्क व सुरक्षितता अभियानात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी बेस्टच्या बसेसमधून लहान मुलांच्या सुरक्षा आणि अत्याचार जनजागृतीपर पोस्टरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
००००
संध्या गरवारे/विसंअ/