भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0 28

ठाणे, दि.19(जिमाका) :- आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा आहे. देशाची शान असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतन ठेवणारे स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमिपूजन ठाण्यात होत आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या “महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंड, वर्तकनगर, ठाणे येथे भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायिका संगीतकार श्रीमती उषा मंगेशकर, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्रीमती मीना खडीकर, ज्येष्ठ गायक आदिनाथ मंगेशकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, ठाणे महापालिका परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, राजू मिश्रा, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पूर्वेश सरनाईक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्व युगांप्रमाणे ‘लता युग’ हे अविस्मरणीय आहे. त्यांची गाणी आजही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लतादीदींची गाणी सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. या विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडून 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज पं. राम मराठे, पी.सावळाराम, श्रीनिवास खळे हे ठाण्यातीलच. भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) गायन-संगीत प्रेमींना निश्चितच उपयुक्त ठरेल. या वाटचालीत शासन मंगेशकर कुटुंबियांच्या कायम सोबत असेल.

ठाण्यातील इतर विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. ठाण्याचा सर्वांगीण विकास होत आहे. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर सुशोभीकरण, स्वच्छतेकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही काम सुरु केले जाणार आहे. जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू असून 50 कोटी रूपये निधी दिला आहे. ‘वापरा आणि फेका’ ही आपली संस्कृती नाही. जुना अनमोल ठेवा जपायला हवा, त्याचे संवर्धन करायला हवे. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यावर खूप प्रेम होते, मी त्यांच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो, त्यांच्या विचारधारेवरच मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहे.

‘ग्लोबल वॉर्मिंग’ या जागतिक समस्येवर  मात करण्यासाठी जागोजागी झाडे लावणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नशील असून ‘अर्बन फॉरेस्ट’ ही संकल्पना लवकरच राबविण्यात येणार आहे. मोठमोठ्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी जबाबदारीने, झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे, याची पूर्ण जाणीव असल्यानेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या साथीने सर्व मिळून जनसामान्यांसाठी अहोरात्र काम करीत आहोत. बंद झालेले अनेक लोकोपयोगी प्रकल्प सुरू करण्यात आले असून नवीन प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. हे सर्वसामान्यांचे शासन आहे, शेवटपर्यंत त्यांच्या हितासाठीच काम केले जाईल, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी दिली.

याप्रसंगी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना विशेष भेट दिली. मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, ठाण्याचे बदलते रूप पाहून मनापासून आनंद होत आहे. या ठाण्याला साजेशी अशी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) ची इमारत लवकरच उभारली जाणार आहे. त्याचा लाभ ठाणे व आसपासच्या परिसरातील सर्वच वयोगटातील गायन-संगीतप्रेमींनी घ्यावा. हे संगीत विद्यालय चालविण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांकडे सोपविल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

श्री. सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करताना ठाणे शहरातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सुरु असलेल्या व नजीकच्या काळात सुरु होणाऱ्या विविध विकासकामांविषयी माहिती दिली. या विकासकामांसाठी भरघोस निधी देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले.

त्यापूर्वी, पोखरण रोड नं. 01 येथील सिंघानिया शाळेसमोरील 3.75 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या पादचारी पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या मुख्य सोहळ्यात, अमृत 2.0 योजनेंतर्गत वर्तकनगर-लोकमान्य नगर, घोडबंदर परिसरातील 200 कोटी रुपये मूल्य असलेला पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबूतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प यांचा शुभारंभ, खर्चाची रक्कम 50 कोटी रुपये असलेल्या शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. याबरोबरच वर्तकनगर प्रभाग समितीतील सर्व चौकांचे सुशोभीकरण करून आजूबाजूच्या परिसराची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल बोर्ड उभारणी (मूल्य 20 कोटी), ओवळा-माजिवडा क्षेत्रातील तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी व सुशोभीकरण (मूल्य 50 कोटी), मुंबईच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रातील फूटपाथवर शोभिवंत रेलिंग लावणे (मूल्य 25 कोटी) या कामांचाही ऑनलाईन शुभारंभ मुख्य सोहळ्यात झाला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.