अभिनेते देव आनंद जन्मशताब्दी वर्षानिमित्त कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
मुंबई, दि. 17 : प्रसिद्ध अभिनेते देव आनंद भारतीय चित्रपट विश्वातील एक दंतकथा होते. आपल्या करिष्माई व्यक्तित्वाने तसेच अभिनय कौशल्याने त्यांनी जनमानसावर अमीट छाप निर्माण केली. त्यांच्या चित्रपटांना दशके लोटली तरी देखील आजही त्यांच्या चित्रपटांमधील गाणी लोकांच्या जिभेवर आहेत. भारतीय चित्रपटाच्या सुवर्ण युगाचे ते एक निर्माते होते, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
देव आनंद यांच्या १०० व्या जयंती निमित्त त्यांच्यावरील ‘के दिल अभी भरा नहीं’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १७) मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
देव आनंद चित्रपट सृष्टीत आले, त्यावेळी भारतीय सिने सृष्टी एका वेगळ्याच उंचीवर होती. त्याकाळात एकापेक्षा एक अभिनेते व अभिनेत्रीच नव्हते, तर उत्कृष्ट गीतकार व संगीतकार देखील होते, असे सांगून आज देखील गाण्याच्या रिॲलिटी शो मध्ये लहान मुले जुनीच गाणी गातात यातच त्या गाण्यांचे यश आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
गेल्या काही वर्षात गुणगुणता येतील अशी गाणीच निर्माण होत नाहीत असे सांगून, संगीताच्या नावाखाली जे काही निर्माण होत आहे तो केवळ कल्लोळ आहे, अशी खंत राज्यपालांनी व्यक्त केली.
राज्यपाल पदाचा राजशिष्टाचार असल्यामुळे थिएटर मध्ये जाऊन सहज चित्रपट पाहता येत नाही किंवा मुंबईची प्रसिद्ध पाव भाजी खाता येत नाही या बद्दल खंत व्यक्त करुन एकेकाळी आपण मित्रांसह, रांगेत उभे राहून व प्रसंगी ‘ब्लॅक’ मध्ये तिकिटे घेऊन, चित्रपटांचे पहिल्या दिवशी पहिला शो पाहत असू, अशी आठवण श्री. बैस यांनी सांगितली.
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बसने लाहोर येथे जाताना त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ‘भारतातून काय आणू’ असे विचारले. त्यावर, भारतातून देव आनंद यांना घेऊन यावे, असे शरीफ यांनी सांगितले, व त्या नुसार वाजपेयी हे देव आनंद यांना घेऊन लाहोर येथे गेले, अशी आठवण राज्यपालांनी यावेळी सांगितली.
देव आनंद यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच केले नाही, तर त्यांनी लोकांचा आत्मविश्वास व आकांक्षा जागवल्या तसेच राष्ट्रीय एकात्मतेला चालना दिली असे राज्यपालांनी सांगितले.
देव आनंद यांच्या वरील या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज व वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
प्रकाशन सोहळ्याला वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री, उपाध्यक्ष अजय रुईया, कझाकस्थानचे मानद वाणिज्यदूत महेंद्र सांघी, कोरस इंडियाचे अध्यक्ष आनंद थिरानी, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालक रूपा नाईक, गायक अनुप जलोटा यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनुप जलोटा यांनी देव आनंद यांच्या गाण्याच्या ओळी गायल्या.
Maharashtra Governor releases Coffee Table Book on Dev Anand
Maharashtra Governor Ramesh Bais released a Coffee Table Book on legendary film star Dev Anand titled ‘Ke Dil Abhi Bhara Nahin’ at World Trade Centre in Mumbai on Fri (17 Nov.)
The book has been brought out by the World Trade Centre Mumbai and All India Association of Industries to commemorate the 100th Birth Anniversary of Dev Anand.
President of World Trade Centre (WTC) Mumbai Vijay Kalantri, Honorary Consul of Kazakhstan in Mumbai Mahendra Sanghi, Vice Chairman of WTC Ajay Ruia, Chairman of Kores India Anand Thirani, Executive Director Rupa Naik, singer Anup Jalota were prominent among those present.
0000