पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मिरज, कवलापूरला ‘आनंदाचा शिधा’ वाटप
सांगली, दि. 10 ( जि. मा. का.) : राज्य शासनाने ‘आनंदाचा शिधा’ देऊन सामान्य माणसाचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे, अशी भावना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केली.
सोमवार पेठ मिरज आणि कवलापूर येथे पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पात्र लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मीना निंबाळकर यांच्यासह परिसरातील मान्यवर पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, आनंदाचा शिधा संचात केवळ १०० रूपयात सहा जिन्नस प्रति लाभार्थी देण्यात येत असल्याने गरजवंतांना सणामध्ये दिलासा मिळाला आहे. आनंदाचा शिधा वितरणात जिल्ह्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. शिधा वितरणामध्ये जिल्हा राज्यात तिसरा आहे. राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळेल याची पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात सुमारे 4 लाख 6 हजार 760 कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे. यामध्ये सांगली 53392, मिरज 46826, कवठेमहांकाळ 23639, जत 51047, आटपाडी 22893, कडेगांव 24890, खानापूर विटा 27088, तासगाव 41612, पलूस 27753, वाळवा 61628 आणि शिराळा तालुक्यात 25992 कुटुंबांना आनंदाचा शिधा संच वाटप करण्यात येत आहे. आनंदाचा शिधा संचात साखर, खाद्यतेल, रवा, चणाडाळ, मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा जिन्नस प्रति शिधापत्रिकास ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या दराने वितरीत करण्यात येत आहे.
मिरज तालुक्यात प्राधान्य गट व अंत्योदय योजनेतील 46 हजार 826 लाभार्थी आनंदाचा शिधा संचासाठी पात्र असून आतापर्यंत मिरज तालुक्यात ६२ टक्के कुटुंबांना आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात आल्याचे तहसीलदार अपर्णा धुमाळ यांनी सांगितले.
कवलापूर येथील आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कवलापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विकास सोसायटीचे मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
०००००