मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये सानुग्रह अनुदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

0 27

मुंबई, दि. ८ : मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीनिमित्त २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याचबरोबर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत गटविमा योजना लागू करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला.

वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेच्या विविध कर्मचारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, माजी आमदार किरण पावसकर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गेल्या वर्षी दिवाळी सानुग्रह अनुदान देताना प्रथमच २५०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ करून २६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी रोजंदारीवर काम करणाऱ्या बहुउद्देशीय कामगारांना देखील सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली. त्यावर रुग्णालय बहुउद्देशीय कामगार आणि बालवाडी शिक्षिकांना दिवाळी भेट देण्यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना निर्देश दिले.

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना लागू असलेली गट विमा योजना २०१७ पासून बंद होती. ती पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देतानाच त्यात वाढ करून पाच लाखांपर्यंतची गट विमा योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आणि ही योजना जानेवारी २०२४ पासून लागू करण्याबाबत प्रशासनाला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले. आशा सेविका यांना एक महिन्याचे वेतन सानुग्रह अनुदान देण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

महानगरपालिकेच्या कामगार वसाहतींमध्ये नियमित स्वच्छता करतानाच तेथील शौचालये, स्वच्छतागृहांची दुरुस्ती देखील करण्यात यावी,  असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सफाई कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी यासाठी शिष्यवृती देण्याची देखील कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.