भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0 6

मुंबई, दि. ७: काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच  छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल. त्यांचे मनोबल उंचावत राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुपवाडा येथे व्यक्त केला. पुतळा अनावरणाच्या निमित्ताने काश्मीर खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला.

आम्ही पुणेकर संस्था, ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी  जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने केली. समोरच्या पर्वंतरांगापलिकडे असलेल्या पाकिस्तामनध्ये हा जयघोष पोहोचला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्याने शत्रू येथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून दहशतवादीही काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाही. ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता. तेव्हा जवानांनी सुमारे १८०० ट्रक माती भरून त्याठिकाणी पुतळ्यासाठी भक्कम पाया करण्यात आला. याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियनच्या जवानांचे कौतुक केले. सातारा येथील मेजर संतोष महाडीक यांना अभिवादन करीत त्यांच्या बलिदानाची आठवण यावेळी त्यांनी सांगितली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक विभागाने विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला याला मोठे महत्त्व आहे. याठिकाणी स्मारक करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा करार करण्यात आला असून ही अभिमानाची बाब आहे. वाघनखे राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर आता काश्मीरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मिर येथे जी २० परिषद घेतली, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले. कुपवाडा येथे असलेले हे स्मारक जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनेल.  आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. हे स्मारक महाराष्ट्र आणि काश्मीरमधील संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आता दरवर्षी कुपवाडा येथे शिवाजी महाराज पर्व- नायब राज्यपाल मनोज सिन्हा

आज कुपवाडा येथे नव्या परंपरेला सुरूवात झाली असून यापुढे प्रत्येक वर्षी कुपवाडा येथे ७ नोव्हेंबरला शिवाजी महाराज पर्व साजरे करण्यात यावे, असे आवाहन नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी जवानांना केले. ‘स्वत:वर विश्वास ठेवा, मी नेहमी तुमच्या सोबत असेन’ शिवाजी महाराजांनी शुरवीरांना दिलेला हा संदेश मराठीतून वाचत श्री. सिन्हा यांनी विविध इतिहासकार आणि कवींनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम गाथांना उजाळा दिला.

शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक- मंत्री सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच शक्ती आहे. उर्जा आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. दैनंदिन जिवनातील प्रत्येक समस्येवर मार्ग दाखविण्यासाठी शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी लंडनमध्ये करार करण्यात आला. राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री. शिरोळे, मेजर जनरल गिरीष कालिया यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठा बटालियनचे जवान, लष्करी अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी साजरी केली जवानांसोबत दिवाळी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुतळा अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी मराठा बटालियन असल्याने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेतला. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेत मुख्यमंत्र्यांनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तुम्ही रात्रं दिवस सीमेवर प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करतात. त्यामुळे आम्ही सर्व सण उत्सव आनंदाने साजरे करू शकतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.