मुनावळे येथील पर्यटन स्थळाच्या जागेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

0 35

सातारा, दि. ५ : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे अंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावातील स्थानिकांना रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी मुनावळे पर्यटन स्थळाच्या जागेची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पुर्षोत्तम जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, स्थानिकांनी ही सुरू होत असलेल्या या पर्यटन स्थळाचा आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा. हे पर्यटन स्थळ विकसित करताना स्थानिकांना त्या मध्ये सामावून घ्यावे. या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून स्थानिकांना त्यांच्या घरा जवळ रोजगार मिळणार आहे. याचा फायदा स्थानिक व येणारे पर्यटक यांनाही होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले, मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यांसारख्या पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. तसेच यामध्ये सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी निरीक्षण मनोरा, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम या सोयी ही असणार आहेत.

ग्रामस्थांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, मासेमारीसाठी परवानगी देण्यात यावी, जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडावे. अतिरिक्त भू संपादन झालेल्या जमिनींचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी विशेष शिबिर घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

बैठकीमध्ये जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

यापूर्वी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी हेलिकॉप्टर मधून वासोटा किल्ला, नागेश्वर मंदिर, अहिरे पुल, बामणोली परिसराची हवाई पाहणी केली.

००००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.