‘शासन आपल्या दारी’त नोकरीची संधी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
यवतमाळ, दि.३१ (जिमाका) : शहराजवळील किन्ही येथे नुकताच शासन आपल्या दारी उपक्रमाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ नागरिकांना देणे हाच उद्देश. मात्र, रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी शासन आपल्या दारीचा कार्यक्रम नवीन उमेद घेवून आला.
कारण, या कार्यक्रमात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या महारोजगार मेळाव्यात २६४ युवकयुवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी २०७ जणांची नामांकित कंपन्यांमध्ये प्राथमिक निवड करण्यात आली. हा मेळावा नक्कीच या बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी देणारा ठरला.
या मेळाव्यात पेटीएम, हिमालया कार्स, वैभव एम्टरप्रायझेस, मेगाफिड बायोटेक आदी नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यांतील एकूण १५०४ जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेवून पात्र ठरणाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे शासन आपल्या दारी कार्यक्रम बेरोजगारांनाही संधी देणारा उपक्रम म्हणून नावारुपाला आला.
राज्यात नाही म्हटले तरी बेरोजगारीचा प्रश्न आहेच. राज्य शासन भरती प्रक्रियाही राबवित आहे. मात्र, स्पर्धा परीक्षार्थींची संख्या मोठी असल्याने आपली निवड होईल की नाही, या मनस्थितीत युवक खाजगी किंवा कंत्राटी नोकरीच्या शोधात असतात. अशातच राज्य शासनाचा शासन आपल्या दारी उपक्रमात रोजगार मेळावे आयोजित करुन बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा फायदा देखील युवकांना झाला आहे. त्याची प्रचिती यवतमाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पंडित दीनदयाळ महारोजगार मेळाव्यातून दिसून आली.
शासन आपल्या दारी कार्यक्रमात आयोजित महारोजगार मेळाव्यात २६४ उमेदवारांना नोंदणी केली होती. त्यापैकी २०७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यातील अर्जून आनंद राठोड आणि पंकज ज्ञानेश्वर जाधव या दोन उमेदवारांना नामांकित कंपनीमध्ये नौकरी मिळाली. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आल्याने उपक्रमाची उंची वाढली आहे.
०००