महिला बचतगटांसाठी सुरु केलेल्या पथदर्शी प्रकल्पास गती द्यावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. 30 : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकसित करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता लोरियल इंडिया आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने सातारा, नाशिक आणि रायगड येथे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे काम गतीने करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
मंत्रालयात महिला आर्थिक विकास महामंडळ आणि लोरियल इंडिया यांच्या प्रतिनिधींसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड, लोरियल इंडियाच्या संचालक कृष्णा विलासनी यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ‘माविम’ एक महिला बचत गटांचे उत्कृष्ट संघटन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य विकसित करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता लोरियल इंडिया आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने सातारा, नाशिक आणि रायगड येथे महिला बचतगट यांना ब्यूटीपार्लरचे प्रशिक्षण देण्यासाठी जागा निश्चित करून प्रशिक्षण देण्याचा कालावधी ठरवणे, बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम ठरवावा, असेही त्या म्हणाल्या.
सार्वजनिक ठिकाणी महिलांना काही वेळेस असुरक्षित वातावरणात प्रवास करावा लागतो हे टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचा आराखडा तयार करावा आणि त्याबाबत महिला व बालविकास विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
लोरियल इंडियाच्या संचालक कृष्णा विलासनी यांनी यावेळी लोरियलमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माहिती सादर केली.
000
संध्या गरवारे/विसंअ/