विभागीय आयुक्त यांच्या उपस्थितीत ’अमृत कलश’ मुंबई मार्गे दिल्लीसाठी रवाना
नागपूर दि. २५ : ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानासाठी नागपुर विभागातील 71 अमृत कलश मुंबई मार्गे दिल्ली साठी आज दुरांतो एक्सप्रेस रवाना झाले.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर अमृत कलश वहन करून नेणाऱ्या स्वयंसेवकांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील 142 स्वयंसेवकांसोबत सर्व अमृत कलश रेल्वेमार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, विभागीय रेल्वे प्रबंधक तुषारकांत पाण्डेय, रेल्वे स्थानक व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, विकास शाखेचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, महानगरपालिका उपायुक्त सुनील लहाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे, विभागीय समन्वयक छत्रपाल पटले यांचेसह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी अमृत कलश रवाना करण्यासाठी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. ‘भारत माता की जय’, वंदे मातरम् आणि ‘मिट्टी को नमन, विरों को वंदन’ या घोषणांनी रेल्वे स्थानक परिसर देशभक्तीमय झाला होता.
मुंबईच्या आजाद मैदानावर राज्यातील सर्व अमृत कलशांचे 27 ऑक्टोबर रोजी पूजन करण्यात येवून ते दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहेत. दिल्ली येथे 31 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ होणार आहे
‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानामध्ये ‘अमृत कलशच्या माध्यमातून विभागात एकत्र केलेली माती देशासाठी बलिदान देणाऱ्या विरांच्या सन्मानार्थ दिल्ली येथील कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या ‘अमृत वाटिकेत’ अर्पण केली जाणार आहे. यासाठी विभागातील सर्व तालुक्यातून 63, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचे प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे सहा आणि नागपूर व चंद्रपूर महानगरपालीकेचे एक-एक असे 71 अमृत कलश 142 स्वयंसेवकांमार्फत रवाना करण्यात आले.
अमृत यात्रेसाठी विभागातील 16 लाख 58 हजार कुटूंबाकडून अमृत कलशात माती संकलीत करण्यात आली. यात नागपूर महानगरपालीकेतील 10 लाख 1351 कुटूंब, चंद्रपूर महानगरपालीका 35 हजार 243 कुटूंब, विभागातील 77 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील 3 लाख 66 हजार 108 कुटूंब व 63 तालुक्यातील 16 लाख 58 हजार कुटूंबांनी सहभाग नोंदविला.
000