चिटेघर प्रकल्पग्रस्तांना साखळी उपोषण थांबवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
सातारा दि. २३ (जिमाका): पाटण तालुक्यातील चिटेघर लघु पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी चिटेघर प्रकल्पबाधित जमिनींचा वाढीव मोबदला देण्यासाठीचा नवीन प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांच्यासह संबधित अधिकारी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांनी आता मंजूर झालेली रक्कम स्वीकारावी असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, जलसंपदा विभागाने सध्या जमिनीच्या मोबदल्यापोटी तीन पट रक्कम संबंधीत प्रकल्पग्रस्तांना वितरीत करावी. तसेच ही रक्कम मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यावर व्याज देण्याबाबतचा प्रस्ताव आणि त्यासोबतच आणखी एक पट मोबदला देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा. सिंचन विभागाने संपादीत केलेल्या जमिनीची रितसर मोजणी करावी व त्यानुसार शेतकऱ्यांच्या शिल्लक जमिनी घेतल्यास त्या त्यांना परत कराव्यात. जिल्ह्यातील प्रस्ताव मार्गी लावण्यास काही अडचणी येत असतील तर त्यासाठी थेट त्यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.
०००