पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

0 4

पुणे, दि.२१:  पुणे शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम साधत शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याचेवेळी दिले.

 यावेळी आमदार सुनील टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रो रेल कॉर्पोशनचे  व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. शिल्पा प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 विकास कामांची  पाहणी  करतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. सार्वजनिक विकासकामे करतांना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. कामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

 

  मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत बंड गार्डन परिसरात नदीचे कामे करताना भविष्यातील पूरपरिस्थितीचा विचार करावा. अशी परिस्थिती उद्भवल्यास पाण्याचा प्रवाह अधिकाधिक वेगाने झाला पाहिजे. पायऱ्यावरील दगडात अंतर राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. या परिसरात विविध जातीची झाडे लावावी. नागरिकांच्या माहितीसाठी त्यांची नावे  इंग्रजीसह मराठीत लिहावीत. ज्येष्ठ नागरिकांना सुलभ सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने विचार करण्यात करण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

 खराडी येथील ऑक्सिजन पार्कची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, अधिकाधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करा. विविधरंगी गवताची लागवड करावी. प्रेक्षक गॅलरीत सुटसुटीत बैठक व्यवस्था करावी. येथील नागरिकांच्या मागणीचा विचार करता परिसरात योगासनांसाठी जागा निश्चित करुन त्याठिकाणी लवकरात लवकर छत्र आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था करा. आरोग्याच्यादृष्टीने पदपथावर पेव्हर ब्लॉक ऐवजी मातीचा वापर करण्याबाबत विचार करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

 भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथील सेवा प्रवेश नियमानुसार पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. येथील परिसरात उभारण्यात येणारे रुग्णालय, प्रशासकीय इमारत, वसतिगृह तसेच  त्याअनुषंगाने कामे महानगरपालिकेने गतीने पूर्ण करावीत. आगामी काळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत अशाच प्रकारचे महाविद्यालय उभारण्याबाबत विचार येत आहे, असेही श्री. पवार म्हणाले. राज्यशासनाच्यावतीने नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

 राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्प अंतर्गत खराडी येथील मल:निसारण प्रक्रिया प्रकल्प, स्वारगेट येथील महामेट्रो प्रकल्प विकास कामांची पाहणी करुन कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.