पोलिसांसाठी प्राथमिक चिकित्सा केंद्र उभारावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पोलीस विभागाला गृहनिर्माण, सीसीटीव्ही कॅमेरांसाठी निधी व स्वतंत्र रुग्णवाहिका
अमरावती, दि. 20 : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमी आरोग्य संपन्न असले पाहिजेत, यासाठी पोलीस विभागाने शहरात प्राथमिक चिकित्सा केंद्र निर्माण करावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
21 ऑक्टोबर, पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयाच्यावतीने कवायत मैदानावर पोलीस अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या शिबिरास खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सर्वश्री प्रताप अडसड, प्रवीण पोटे-पाटील, रवी राणा, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक एम. राकेश कलासागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी, पोलीस स्मृती दिनानिमित्त सर्व दिवंगत पोलीसांना अभिवादन करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, पाच लाखाच्या खर्च मर्यादेपर्यंत आजारावर उपचारासाठी राज्यातील साडेबारा कोटी जनतेसाठी महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना शासनाने अमंलात आणली आहे. या योजनेचा लाभ तळागळातील सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी सुमारे सतराशे कोटी रुपयांचा प्रिमियम राज्य शासनाने भरला आहे. या योजनेंतर्गत पाच लाखपर्यंतच्या तपासणी व औषधोपचार सवलतीचा लाभ गरजूंना मिळत आहे. या योजनेतून गरीब व आर्थिक दुर्बल घटकांसह सर्वांनाच मोठ्या आजारावरील शस्त्रक्रिया व औषधोपचाराचा लाभ विनामुल्य मिळवून दिला जातो. केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मोफत उपचाराची सुविधा झाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आजारावर महागड्या उपचारांची व्यवस्था करुन देण्यात येत आहे. दर आठवड्याला माझ्या पत्रामुळे दिड ते दोन कोटी रुपये निधी अशा गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी दिले जातात, असेही त्यांनी सांगितले.
माझ्या टिमकडून मुंबई-पुण्याला जाऊन उपचार करणे अशक्यप्राय असलेल्यांसाठी निवारा व भोजनाची व्यवस्था मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गरजू लोकांसाठी अत्याधुनिक मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून फिरते रुग्णालयाची सुविधा देण्यात येत आहे. त्याव्दारे आजाराच्या सर्व प्रकारच्या तपासण्या व उपचार सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर अमरावती येथे सुध्दा पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र प्राथमिक चिकित्सा केंद्र व औषधोपचार व्यवस्था निर्माण करण्याचे नियोजन केल्यास, आवश्यक मदत करण्याचा मनोदय श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. कोविड काळात आरोग्याचे महत्व सर्वांना लक्षात आले. सर्वांचे आरोग्य उत्तम राहील, अशा शुभेच्छा देवून त्यांनी पोलीस गृहनिर्माण योजना, सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली असल्याचे सांगून पोलीस विभागाला रुग्णवाहीका मंजूर करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
प्रारंभी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी प्रास्ताविकात आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
आरोग्य शिबिराच्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपर स्पेशालिटी, झेनिथ हॉस्पीटल, अच्युत महाराज हार्ट हॉस्पीटल, पीडीएमसी हॉस्पीटल, दयासागर हॉस्पीटल, हायटेक मल्टीस्पेशालिटी, हेडगेवार हॉस्पीटल, हरिना नेत्र फाउंडेशन, पोलीस मुख्यालय हॉस्पीटल आदींचे तज्ज्ञ डॉक्टर सर्व सुविधांसह तसेच आजारासंबंधीचे सोळा विभाग कार्यरत करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबिराला पोलीस कर्मचारी व त्यांचे कुंटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.