६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान
नवी दिल्ली, 17 : 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता श्रेणीतील पुरस्कार, द कश्मीर फाइल्स या चित्रपटास, तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत थ्री टू वन या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विज्ञान भवनात 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि पर्यवेक्षक समितीचे अध्यक्ष मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आज प्रदान झालेले पुरस्कार वर्ष 2021 चे आहेत. कोरोना महामारीमुळे वर्ष 2021 मधील पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले.
‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच ‘गोदावरी’, ‘थ्री टू वन’, ‘रेखा’, ‘या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. फिचर फिल्ममध्ये विविध 32 श्रेणीत पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध 24 श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
हिंदीमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा ‘सरदार उधम’
हिंदीमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा ‘सरदार उधम’ ठरला. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, ‘सरदार उधम’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर, सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: री-रेकॉर्डिंग या श्रेणींत राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार ‘पुष्पा’ या तेलुगु चित्रपटासाठी अल्लू अर्जुन यांना प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार यावेळी दोन अभिनेत्रींना प्रदान करण्यात आला. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी आलिया भट, तर ‘मिमी’ या चित्रपटसाठी क्रिती सेनॉन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार ‘मिमी’ या हिंदी सिनेमासाठी पंकज त्रिपाठी तर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ अंतराळ वैज्ञानिकावर आधारित चित्रपटाला प्रदान करण्यात आला. तर, शेरशाह चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण मनोरंजन या श्रेणीतील पुरस्कार ‘आरआरआर’ या तेलुगु सिनेमाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता श्रेणीतील पुरस्कार ‘द कश्मीर फाइल्स’ या हिंदी सिनेमाला सन्मानित करण्यात आले.
एकदा काय झालं – सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा बहुमान
प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यात मराठी भाषेसाठी ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले असून रजत कमल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वडील आणि मुलाच्या नात्यातील नितांत सुंदर आणि हळवा प्रवास चित्रपटातून दाखविण्यात आलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि 1 लाख रूपये रोख आहे.
निखिल महाजन यांना ‘गोदावरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार
‘गोदावरी’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक व आघाडीचे सिने-दिग्दर्शक निखिल महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप स्वर्ण कमळ, 2 लाख 50 हजार रोख असे आहे. याआधी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही ‘गोदावरी’ सिनेमाला गौरवण्यात आले आहे.
‘गोदावरी’ हा कौटुंबिक सिनेमा आहे. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा असा हा सिनेमा आहे. नाशिकमध्ये राहणाऱ्या निशिकांतच्या हसत्या खेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आले आहे. नाशकातील गोदावरी नदी हा या सिनेमाचा मुख्य दुवा आहे.
नॉनफिचर मध्येही मराठी चित्रपटांची मोहर
नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली. नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘थ्री टू वन’ या हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत असणाऱ्या चित्रपटला प्रदान करण्यात आला. ‘थ्री टू वन’ या सिनेमाची निर्मिती एफटीआयआय ची असून दिग्दर्शक हिमांशू प्रजापती यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि प्रत्येकी 50,000 हजार रूपये रोख आहे.
‘रेखा’ या मराठी नॉन फिचर फिल्मला विशेष परीक्षक श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर बापु रणखांबे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि 1 लाख रूपये रोख आहे.
एंडेन्जर्ड हेरिटेज वर्ली आर्टला सर्वोत्कृष्ट प्रमोशनल डॉक्युमेंटरी चित्रपटाचा पुरस्कार
एंडेन्जर्ड हेरिटेज वर्ली आर्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रमोशनल डॉक्युमेंटरी फिल्मचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत वर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ व 50 हजार रोख असे आहे. वारली महाराष्ट्रातील एक जमात आहे, जी डहाणू आणि जव्हारच्या आसपासच्या भागात राहते. लग्नाच्या निमित्ताने हे लोक आपल्या घराच्या भिंतींना गेरूने प्लास्टर करतात आणि तांदळाच्या पिठाने चित्रे काढतात. या चित्रांवर आधारित हा चित्रपट आहे. याचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि संपादक हेमंत वर्मा आहेत. हेमंत वर्मा हे हरियाणातील भिवानी शहरातील रहिवासी असून गेल्या 35 वर्षांपासून ते मुंबईत राहत आहेत.
वहिदा रेहमान ‘दादासाहेब फाळके’ यांना जीवनगौरव पुरस्कार
भारतीय चित्रपटसुष्टीला 66 वर्षे दिलेल्या अतुलनीय योगदानबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना 53 व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
सहा दशकांच्या कारकिर्दीत वहिदा रेहमान यांनी 90 हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. प्यासा, कागज़ के फूल, चौदवी का चाँद , साहेब बीबी और गुलाम, गाईड, खामोशी आदी चित्रपटांमध्यील त्यांच्या भूमिकांचे समीक्षकांनी कौतुक केले. आपल्या अभिनय सामर्थ्यांच्या जोरावर त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. गाइड (1965) आणि कमलमधील (1968) भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. रेश्मा आणि शेरा (1971) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. वर्ष 1972 मध्ये त्यांना पद्मश्री, तर वर्ष 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुरस्काराचे स्वरूप स्वर्ण कमळ, रुपये 10 लाख, शाल व प्रशस्ती पत्र असे आहे.
‘गाईड’, ‘बीस साल बाद’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ चित्रपटांचा आनंद घेण्याची प्रेक्षकांना संधी
ज्येष्ठ अभिनेत्री, वहिदा रेहमान यांना 53व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराचे औचित्य साधून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी-एनएफएआय) यांच्या मार्फत ‘वहिदा रहमान रेट्रोस्पेक्टिव्ह’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीच्या महादेव मार्ग येथील फिल्म डिव्हिजन ऑडिटोरियम येथे 18 ते 21 ऑक्टोबर 2023 दरम्यान दररोज सायंकाळी 6 वाजता या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येईल. यामध्ये बुधवार, 18 ऑक्टोबर रोजी गाइड (1965), गुरुवार, 19 ऑक्टोबर रोजी बीस साल बाद (1962), शुक्रवार, 20 ऑक्टोबर रोजी प्यासा (1957), तर शनिवार, 21 ऑक्टोबर रोजी कागज के फूल (1959) या चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेशिकांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. |
0000000000000
अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 187, दि.17.10.2023