महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्रामुळे चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना तत्पर सेवा-सुविधा मिळतील – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
कोल्हापूर, दि. 16 (जिमाका): महाराष्ट्रातील एकमेव आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. या विद्यापीठाच्या कोल्हापुरात होत असलेल्या विभागीय केंद्रामुळे कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना तत्पर सेवा- सुविधा मिळतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शेंडा पार्कच्या १,१०० बेडच्या हॉस्पिटलच्या भूमिपूजनाबरोबरच या विभागीय केंद्राचे भूमिपूजनही संपन्न करू, असेही ते म्हणाले.
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राच्या उद्घाटन समारंभात मंत्री श्री. मुश्रीफ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये ६० वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या सर्वच महाविद्यालयांच्या प्रशासकीय कामासाठी त्यांना नाशिक येथे ये- जा करावी लागत असे. कोल्हापूर विभागीय केंद्रामुळे सर्वांचा हा त्रास वाचेल. हे विभागीय केंद्र सर्व सुविधायुक्त आणि सुसज्ज होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर म्हणाल्या, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यातील तीन एकर जागा या विभागीय केंद्रासाठी दिली. त्यांच्या गतिमान कार्यपद्धतीमुळेच अल्पावधीतच हे विभागीय केंद्र साकारत आहे. त्यांनी मनावर घेतल्यामुळेच नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे पूर्ण क्षमतेचे विभागीय केंद्र इतक्या तत्परतेने कोल्हापुरात साकारत आहे. यामुळे या चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचा त्रास कमी होणार आहे.
अवयव दानासाठी जागृती हवी……!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मी डॉक्टर नाही परंतु; वैद्यकीय क्षेत्रात मनापासून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. मरणोत्तर अवयव दान तसेच अपघात, आघात यामुळे मेंदूमृत रुग्णांकडून अवयव दान झाल्यास अनेक जणांना नवजीवन मिळेल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून या विषयावर महाराष्ट्रभर प्रबोधन व्हावे, ही अपेक्षा आहे.
व्यासपीठावर प्रति कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखा अधिकारी नरहरी कळसकर, उप कुलसचिव तथा समन्वयक महेंद्र कोठावदे, विभागीय केंद्र समन्वयक डॉ. राजकुमार पाटील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत उपकुलसचिव तथा समन्वयक महेंद्र कोठावदे यांनी केले. प्रास्ताविक कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुनिता शिराळे यांनी केले. आभार विभागीय केंद्र समन्वयक डॉ. राजकुमार पाटील यांनी मानले.
000