बचत गटातील सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालन उपयुक्त-महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे

0 45

पुणे, दि. १३ : बचत गटातील सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालन उपयुक्त आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी केले.

सावरकर भवन येथे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सुरू असलेल्या तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालनास मंत्री कुमारी तटकरे यांनी भेट दिली. यावेळी त्या  बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, उपयुक्त राहुल मोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुरेश टेके, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) तृप्ती ढेरे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी अर्चना क्षिरसागर आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटातील सदस्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालनासारखे उपक्रम स्तुत्य असून यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळत आहे. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत याचे समाधान वाटते.

सणासुदीच्या कालावधीत महिलांना उपयुक्त ठरणाऱ्या व इतर वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या जातात. तसेच फूड्स दालनात विविध खाद्य पदार्थांची विक्री केली जाते. याला बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांसोबत बैठका घेऊन ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

महिला बचत गटांच्या बळकटीकरणासाठी तसेच फूड्स आणि कलादालनाच्या विकासासाठी उपाययोजना सुचवाव्यात. बचत गटांच्या उन्नतीसाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी  कुमारी तटकरे यांनी  तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादालनाची पाहणी करुन महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधला. श्री. नारनवरे यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.