राज्य घटनेनुसार लोकसेवेचे काम सुरु राहणार – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ,दि.१३ (जिमाका) : भारतीय राज्यघटनेमध्ये लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लिखित आहेत. या राज्यघटनेनुसारच लोकसेवेचे काम सुरु असून यापुढेही ते सुरु राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
दिग्रस तालुक्यातील लाख, तुपटाकळी आणि सावंगा येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख, राजकुमार वानखेडे, उत्तमराव ठवकर, लाख, तुपटाकळी आणि सावंगा ग्रामपंचायतीचे सरपंच, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, राज्यघटनेचे शिल्पकार डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लोकप्रतिनिधींचे कर्तव्य, जबाबदाऱ्या समाविष्ट केल्या आहेत. या घटनेनुसारच कृती आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. जातीधर्म, गरीब-श्रीमंत न पाहता सर्वसामान्य, शेतकरी हिताची कामे केली जात आहे. गोरगरीब, शेतकरी, महिलांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. लोकहिताची कामे ही बोलण्यापेक्षा करुन दाखवण्यावर माझा विश्वास आहे. लोकांचे ऋण फेडण्याच्या भूमिकेतून काम करीत आहे. यापूर्वीही अनेक विकासाची कामे केली असून यापुढेही सार्वजनिक विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही पालकमंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.
आगामी काळात मोठे उद्योग आणून तरुणांना रोजगाराच्या संधी ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी धोरण आखले जात आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना उद्योग उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जात आहे. ग्रामसंघांना गोदामासाठी ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात डांबरी पांदन रस्ते, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न करणार आहे. जलसंधारणाची कोट्यवधी रुपयांची कामे होणार आहेत. त्याचे नियोजन सुरु आहे. निराधारांना १५०० रुपये देण्यात येणार आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणण्याचा प्रयत्न करत आहोत.
शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून आर्थिक सहाय्य दिले जात आहे. आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया, गोरगरिब रुग्णांना मदत आदी लोकाभिमुख कामे केली जात असल्याचे पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले.
पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस तालुक्यातील लाख येथे २ कोटी २९ लाख, तुपटाकळी ३ कोटी २० आणि सावंगा येथील २ कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
चिमुकल्यांनी केले नऊ भाषेत पालकमंत्र्यांचे स्वागत
तुपटाकळी येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या मुलामुलींनी जपानी, ग्रीक, इंग्रजी, तेलगु, कन्नड, गुजरातीसह नऊ भाषांमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांचे स्वागत केले. चिमुकल्यांच्या या भाषाज्ञानाचे कौतुक करुन पालकमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.