रुग्णांना तत्काळ उपचारसेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

0 5

अमरावती, दि.6 : रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येकाला तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी चोवीस तास सतर्क राहून आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधा, औषधी व उपकरणांची तजवीज करुन ठेवावी. औषधे व उपचाराअभावी कोणालाही जीवाला मुकावे लागणार नाही, यासाठी आरोग्य यंत्रणेने जबाबदारीपूर्वक काम करावे. आरोग्य सेवा-सुविधांबाबत नियमितता राहण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका प्रशासन आदींनी आरोग्य केंद्र, रुग्णालयांना दररोज प्रत्यक्षरित्या भेट द्यावी. तेथील आरोग्य सेवासुविधांचा, अनुषंगिक बाबींचा आढावा घेऊन त्यासंबंधीचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होत्या. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागाचा आरोग्य व्यवस्थेसंबंधीचा आढावा दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून घेतला. अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त देविदास पवार, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून आरोग्य विभागाने रुग्णांना तात्काळ उपचार सेवा-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जिल्ह्यातील प्रत्येक गरजूला वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत, ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याने आरोग्यविषयक बाबींची पूर्तता होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. आरोग्य सेवा सुविधांबाबत सुसुत्रता व नियमितता राहण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील रुग्णालयांना सकाळच्या सुमारास दररोज प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करावी. तसेच तपासणी करताना रुग्णालयाच्या नियमित कामांत अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. आयसीयु व ओपीडीतील रुग्णांशी संवाद साधून उपचार व सोयीसुविधेबाबत माहिती जाणून घ्यावी, जिल्ह्यातील क्षेत्रीय रुग्णालयांना भेटी देऊन आवश्यक वैद्यकीय बाबींचा आढावा घ्यावा. ग्रामीण भागातील रुग्णांशी संवाद साधून त्यांची गाऱ्हाणी समजून घ्यावी. आवश्यकतेनुसार आवश्यक निधी जिल्हा नियोजन योजनेतून आरोग्य संस्थांना उपलब्ध करुन द्यावा, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी ‘इंद्रधनुष्य मिशन’ची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करावी. औषधांचा साठा, वैद्यकीय उपचार यंत्र, संसाधन, बाह्य व आंतर रुग्ण कक्षातील(ओपीडी-आयपीडी) रुग्ण संख्या, वैद्यकीय उपकरणांची सद्यस्थिती, डॉक्टर्स व परिचारिकांची संख्या, सुरक्षा रक्षक, वार्डातील रुग्णांची सद्यस्थिती, प्रसुती व शिशू अतिदक्षता व ओपीडी कक्षातील सोयीसुविधेबाबत सविस्तर आढावा घेण्यात यावा. रुग्णांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनामार्फत सर्तकता बाळगण्यात यावी. यासाठी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय उपकरण-यंत्रे, वैद्यकीय तज्ज्ञ, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ नियमितपणे सेवेत उपलब्ध ठेवावे. रुग्णालय व रुग्णालयाचा परिसरात नियमितपणे स्वच्छता ठेवावी. शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा रुग्णालयात नियमित उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. तसेच रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी कार्यवाही करावी. मनुष्यबळ कमी असल्यास कंत्राटीपद्धतीने पदे भरुन कामे करावीत, असेही विभागीय आयुक्तांनी  यावेळी सांगितले.

आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना परत पाठवू नये, त्यांना आवश्यक असणारे उपचार व औषधे तातडीने उपलब्ध करून द्यावीत. आरोग्य केंद्रात शुध्द पिण्याचे पाणी व वीज पुरवठा अखंडीत सुरु राहील याची दक्षता घ्यावी. दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना वेळेत वैद्यकीय उपचार पुरविण्यासाठी पुरेसा औषधसाठा, आवश्यक लसी, इंजेक्शन केंद्रात उपलब्ध ठेवावा. औषधसाठा संपण्यापूर्वी पुरेशा वेळेत त्याचा अंदाज घेऊन आवश्यक औषध साठा वेळेत उपलब्ध होईल, याची खात्री बाळगावी. औषधसाठ्याची माहिती ई-सुश्रुत किंवा ई-औषधी या पोर्टलवर वेळोवेळी अपलोड करावी, आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचीही आस्थेने चौकशी करून दाखल रुग्णावर तातडीने आवश्यक व योग्य औषधोपचार करावेत, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर रुग्णालय व रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा, असेही डॉ. पाण्डये यांनी यावेळी सांगितले.

00000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.