आयुष मंत्रालयातर्फे विभागीय बैठकीचे उद्या मुंबईत आयोजन
मुंबई, दि.८ : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाची तिसरी विभागीय बैठक सोमवार ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी 10 वाजता मुंबईतील सहारा स्टार हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनाच्या आरोग्य विभागाअंतर्गत आयुष विभागाने या बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांचे तसेच दादरा नगर हवेली, दीव दमण, व अंदमान निकोबार येथील मंत्री व वरिष्ठ आयुष अधिकारी सहभागी होतील. या बैठकीत राष्ट्रीय आयुष अभियानअंतर्गत सुरु असलेल्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेण्यात येणार आहे.
या बैठकीसाठी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई कालुभाई, राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आयुष मंत्रालय दिल्लीच्या सहसचिव कविता गर्ग, केंद्रीय आयुष विभागाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. राज्यांचे आयुष विभागाचे प्रधान सचिव, सचिव, आयुक्त, व आरोग्य संचालकही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आयुष विभागाचा आढावा तसेच आयुष अंतर्गत सुरु असलेल्या उपचार पद्धतीचा प्रचार, प्रसार व यशोगाथा याबाबत चर्चा व सादरीकरण होणार आहे.
000