पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा
बीड, ( जिमाका ) 7: बीड जिल्ह्यातील मागासलेपणा दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तसेच सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या स्तरावर कटिबद्ध राहून काम करावे, आपल्या या प्रयत्नाने बीड जिल्ह्याची तकदीर आणि तस्वीर दोन्ही बदलणे शक्य होणार, असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत केले. जिल्ह्यातील विकास कामांची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेत बैठक आयोजित करण्यात आली. याप्रसंगी सर्वश्री आमदार प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कर्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणून श्री. मुंडे यांची ही प्रथम आढावा बैठक असून यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी निगडित महत्त्वाचे विषय जसे पाणीटंचाई,चारा टंचाई, भूमी अधिग्रहण, थेट लाभ हस्तांतरण, महात्मा गांधी रोजगार हमी योजना अशा महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर आढावा घेण्यात आली. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांची स्थितीची माहिती माहिती घेण्यात आली.
यावेळी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या समस्यांविषयी पालकमंत्री यांच्यासमोर विषय मांडले. पाणीटंचाई तसेच चारा टंचाई पुढील काळात होण्याची शक्यता असल्यामुळे हे संकट शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिले.
‘हर घर नल योजने’अंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेताना पाण्याची स्त्रोतांची माहिती मिळाल्यानंतरच पाईपलाईनचे काम करण्यात यावे, अशी सूचना श्री. मुंडे यांनी यावेळी केली. हर घर जल योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक घराला मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
थेट बँक खात्यामध्ये हस्तांतरित होणाऱ्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी काही तांत्रिक कारणांमुळे राहून गेल्यात त्या दूर करून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, याविषयीची दक्षता घ्यावी, असेही निर्देश श्री मुंडे यांनी यावेळी दिले.
पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी सूचना पालकमंत्री श्री. मुंडे यांनी केल्या.
मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू असून याचाही लाभ शेतकऱ्यांना मिळावा. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्धता असणार आहे त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असेही निर्देशित केले.
विकास कामांसाठी होणारे भूसंपादनमध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळण्याबाबतच्या सूचना श्री मुंडे यांनी यावेळी केल्या.
रोजगार हमी योजनेअंतर्गत होणारे काम पुढच्या पंचवीस वर्ष दिसेल अशा पद्धतीने करण्यात यावे, असे सांगून श्री मुंडे म्हणाले जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात विशेष बाब म्हणून विहिरी बांधण्याचे रोजगार हमी अंतर्गत देण्यात यावे.
मागेल त्याला रेशन कार्ड आणि निराधार योजनेचा लाभ प्राथमिकतेने लाभार्थ्यांना देण्यात यावा, अशा सूचना श्री मुंडे यांनी यावेळी केल्या.
जिल्हा शासकीय रुग्णालयाचा आढावा
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाच्या स्थितीचा आढावा घेताना रुग्णांना कोणतीही प्रकारची कमतरता होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासह रुग्णांची रुग्णालयात आल्यावरची स्थितीची सविस्तर टिपणी करावी, अशी महत्त्वाची सूचना श्री मुंडेंनी केली.
बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील पदभरतीचा विषय येत्या काही काळात दूर केला जाईल, असे आश्वासनही मुंडे यांनी यावेळी दिले. जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त 150 बेडचे नवीन शासकीय इमारत उभी होत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली. या नवीन रुग्णालयात असणाऱ्या पायाभूत सुविधा लवकरात लवकर पूर्ण करून रुग्णांसाठी उपलब्ध व्हावे, असे सूचना अशी श्री. मुंडे यांनी यावेळी दिल्या. तसेच निधीची कमतरता भासणार नाही असेही आश्वासन दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्र द्वारे गरोदर महिलांसाठी सोनोग्राफी करण्यासाठी ने आण करण्याची व्यवस्था शासनाकडून केली जात असल्याची माहिती यावेळी मंत्र्यांना देण्यात आली क्षयरोग रुग्णांसाठीही अशी व्यवस्था उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले. आरोग्य विभागा अंतर्गत येणारे आयुष्मान भारत चे ओळखपत्र जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध व्हावे यासाठी अधिक सक्रय राहून काम करण्याच्या सूचना श्री मुंडे यांनी यावेळी दिल्या.
*******