रेशीम शेती : आर्थिक उन्नतीचा शाश्वत मार्ग – महासंवाद

0 11

दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसायासारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून हा व्यवसाय करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन पिक संगोपन पध्दतीमुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठ्या प्रमाणात करता येतो. अवघ्या 14 दिवसांत उत्पन्न देणारे रेशीम कोषाशिवाय एकही नगदी पिक नाही. या पार्श्वभूमीवर विभागातील रेशीम कोष उत्पादन आणि रेशीम उद्योगावर माहितीपर लेख…

दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसायासारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन पिक संगोपन पध्दतीमुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठ्या प्रमाणात करता येतो. या व्यवसायामध्ये कुटुंबातील सर्वच सदस्य सहभागी होऊ शकतात त्यामुळे मजुरांची आवश्यकता निर्माण होत नाही यामुळे मजुरी खर्चात व वेळेत मोठ्या प्रमाणात बचत होते. पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली असल्याने शेतकऱ्यांना रेशीम शेतीमध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते. निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत तुतीची लागवड करता येते. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी न करता यात दरमहा उत्पन्न मिळविता येते.

तुतीची लागवड

पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पान्नात वाढ होते. पट्टा पध्दतीस कमी पाणी लागते. एक एकर ऊसासाठी लागणाऱ्या पाण्यात 3 एकर तुती जोपासता येते. तुतीची लागवड एकदा केल्यानंतर 15 वर्षे पर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही. त्यामुळे इतर पिकांप्रमाणे वारंवार लागवडीचा खर्च येत नाही. तुतीस एप्रिल, मे या उन्हाळी महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनादेखील हा व्यवसाय करता येतो. कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून ते जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय उत्तम रितीने करता येतो. ऊस, द्राक्षे यासारखी नगदी पिके घेणाऱ्या तसेच दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन यासारखे शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो. पट्टा पध्दतीने तुतीची आंतरमशागत राखी अवजाराने कमी खर्चात व कमी वेळेत वेळेवर करून घेता येते. पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती शेतीत इतर आंतरपिके घेवून उत्पन्नात भर घालता येते. तुतीवर बागेस रोग व किटक यांचा प्रादुर्भाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. शासनामार्फत रेशीम अळ्यांची अंडीपुंज सवलतीच्या दराने पुरवली जातात. रेशीम अळयांचे आयुष्यमान 28 दिवसांचे असते. त्यातील 24 दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या 21 दिवसापैकी सुरवातीचे 10 दिवस शासनामार्फत वाजवी दराने रेशीम किटक जोपासून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यास अवघ्या 14 दिवसात कोष उत्पादनाचे पीक घेता येते. यामुळे शेतकऱ्याचा वेळ, श्रम व पैसा वाचतो व एकूण उत्पादनात 25 टक्यांपर्यत पर्यंत वाढ होते. इतर शेती पिकांप्रमाणे रेशीम शेतीमधे मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही. शेतकऱ्याच्या रेशीम कोष खरेदीची शासनाने हमी घेतली असून त्यांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी कोष खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

रेशीम उद्योगातून इतर फायदे

रेशीम अळ्यांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून खायला देता येते. यामुळे जनावरांची दूधाची क्षमता वाढते.  वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅसमध्ये उपयोग करतो येतो. तुतीच्या वाळलेल्या काडयांचा इंधन म्हणून तसेच खतनिर्मितीसाठी वापर होतो.

रेशीम संचालनालयाच्या पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार, पालघर (जव्हार) व सिंधुदुर्ग जिल्हयांचा सामावेश आहे. विभागात 3 हजार 419 शेतकऱ्यांनी 3 हजार 568 एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली आहे. विभागात 88 हजार 50 अंडीपुंजाचे वाटप करण्यात आले असून त्याद्वारे सुमारे 625 मेट्रीक टन रेशीम कोषाचे उत्पादन झाले आहे. रेशीम शेतीमुळे विभागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी लक्षाधिश झाले आहेत. पुणे विभागात सन 2021-22 मधे मार्च,2022 अखेर 900 शेतकरी लक्षाधीश झाले असून त्यामधे पुणे जिल्हयातील 293, सोलापूर जिल्हयातील 231, व अहमदनगर जिल्हयातील 192 शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांकडे तयार होणारे कोष खरेदी-विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती, जि.पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर येथे रेशीम कोष खरेदी-विक्री मार्केट स्थापन करण्यात आले आहे. कोष विक्री कोठे करावी, याचे शेतकऱ्यांवर बंधन नाही. यामुळे काही वेळा शेतकरी राज्यातील इतर मार्केट किंवा शेजारच्या राज्यातील मार्केटमधे कोष विक्री करुन चांगला फायदा कमावत आहेत.

बारामती बाजार समितीत ऑनलाईन लिलाव

शेतकऱ्यांना शेतमालाची योग्य किंमत मिळावी आणि शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दलालांची मध्यस्थी दूर व्हावी, यासाठी केंद्र शासन ई-नाम योजना राबवित आहे. यंदा देशात प्रथमच पुणे जिल्हयातील बारामती बाजार समितीत रेशीम कोषाचा ऑनलाइन लिलाव सुरु करण्यात आला. ई-नाम योजनेअंतर्गत झालेला हा देशातील पहिलाच ऑनलाइन लिलाव आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथील व्यापाऱ्याने 2 लाख 81 हजार रुपये किंमतीच्या एकूण 535 किलो रेशीम कोषांची ऑनलाइन खरेदी केली. बारामती येथे कोषांची प्रतवारी ठरविण्यासाठी बेंगळुरु येथील केंद्रिय रेशीम मंडळाकडून कोष प्रतवारी तपासणी  प्रयोगशाळेसाठी  भरीव तरतूद करण्यात आली असून बारामती येथे प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना कर्नाटकातील धारवाड येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या कोषांची प्रयोगशाळेत प्रतवारी ठरवून ऑन लाईन पद्धतीने कोषांचा लिलाव केला जातो. महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर येथील रिलर्ससह कर्नाटकातील रिलर्स लिलावामधे ऑनलाईन पद्धतीने भाग घेतात व मालाला चांगला भाव देतात. यामुळे कोषांच्या खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता येते व शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो. ई-नाम योजनेत कोष खरेदी-विक्री करणारे बारामती हे फक्त राज्यातीलच नाही तर देशातील पहिलेचे मार्केट आहे. ई-नाम पद्धतीने मार्केट सुरू झाल्यापासून एका महिन्यात या केंद्रावर सुमारे 44 लक्ष रुपये मुल्याची खरेदी-विक्री झाली आहे. आतापर्यंत पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी येथे कोष विक्री केली आहे. ऑनलाईन पद्धतीने केलेल्या कोष विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होते. यासाठी कोष विक्रीसाठी मार्केटला नेतांना शेतकऱ्यांनी सोबत आधार कार्ड व बँकेच्या पहिल्या पानाची स्वच्छ झेरॉक्स प्रत सोबत घेवून जावी, असे आवाहन रेशीम संचालनालयाने केले आहे.

पुणे विभागात कोल्हापूर जिल्हयात गडहिंग्लज येथे महाराष्ट्र शासनाचे एकमेव अंडीपुंज निर्मीती केंद्र असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना येथून अंडीपुंजांचा पुरवठा केला जातो. शासनाने 14 नोव्हेंबर,2022 पासून सीड कोष तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना कोषांच्या प्युपाच्या प्रतवारीनुसार प्रति किलो 950 ते 1 हजार रुपयांपर्यंत भाव दिला आहे. यामुळे सीड कोष तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

विभागात एकूण 24 चॉकि सेंटर असून अनुभवी शेतकरी येथे पहिल्या दोन अवस्थेपर्यंत रेशीम आळयांची जोपासना करून पुढील संगोपनासाठी रेशीम उद्योजक शेतकऱ्यांना देतात. यामुळे चॉकिधारक शेतकऱ्यांना आठ दिवसात उत्पन्न मिळते तर रेशीम उद्योजक शेतकऱ्यांना कोष विक्री पासून पंधरा दिवसात उत्पन्न मिळते.

रेशीम उद्योजक शेतकऱ्यांना ‘मनरेगा’ तसेच ‘सिल्क समग्र’ या योजनेतून शासनामार्फत अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांना उद्योगाची शास्त्रीय माहिती व्हावी यासाठी वेळोवेळी संबधित जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी मेळावे, प्रशिक्षण, अभ्यास दौरे आयोजित करुन रेशीम उद्योगाची माहिती देण्यात येते. सन 2023-24 या वर्षासाठी रेशीम उदयोगासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी यासाठी सर्व जिल्हयात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी आणि रेशीम उद्योगाचा फायदा घ्यावा, असे अवाहन पुण्याच्या प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहायक संचालक श्रीमती देशपांडे यांनी केले आहे.

०००

जयंत कर्पे,

सहायक संचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय, पुणे

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.