जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुण्याची प्रगती, क्षमता आणि संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचविण्याची संधी – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

0 9

पुणे दि.१५: जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुण्याची प्रगती, क्षमता आणि संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचविण्याची संधी असून त्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, तसेच हे आयोजन पुणेकरांसाठी गौरवाचा विषय असल्याने आयोजन यशस्वी करण्यासाठी नागरिकांचाही सहभाग घ्यावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

पुणे येथे १५ व १६ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या जी-२० बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.  या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, आपल्याकडे तीन बैठका होणे ही एकप्रकारे भाग्याची गोष्ट आहे. एवढे मोठे आयोजन यशस्वी करण्यासाठी नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे. जी-२० बैठकांमध्ये सहभागी प्रतिनिधींच्या प्रवासाच्या मार्गावरील स्वच्छते सोबत परिसर सुंदर दिसण्यावरही भर द्यावा लागेल.

सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक कलाप्रकारांचा समावेश करावा. महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास, पुण्यातील शैक्षणिक-सांस्कृतिक समृद्धी प्रदर्शित करावी. सर्वसामान्य नागरिकांना तयारीत सहभागी करून घ्यावे आणि त्यांना या बैठकांच्या महत्वाविषयी माहिती द्यावी. विविध क्षेत्रातील नागरिकांना एकत्र करून त्यांच्यासमोर जी-२० बैठकीबाबत सादरीकरण करावे.

विभागीय आयुक्त राव यांनी पुणे येथे होणाऱ्या जी-२० उपसमित्यांच्या बैठकीच्या नियोजनाविषयी माहिती दिली. जी-२० देशांच्या विविध समित्यांच्या माध्यमातून माहिती-तंत्रज्ञान, व्यापार सहकार्य, पर्यावरण, हरित उर्जा, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील देवाणघेवाण आदी विविध विषयांच्या २०० बैठका देशात होणार आहेत. त्यापैकी २६ महाराष्ट्रात होणार असून ३ पुण्यात होणार आहेत. पुण्यातील बैठकांचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पूर्वतयारीविषयी सादरीकरण केले. या आयोजनाचा निमित्ताने शहर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्ता दुरुस्ती आणि चौक सुशोभीकरणही करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.

पुण्याचे ब्रँडिंग करण्यासाठी पर्यटन विभागातर्फे माहितीपट तयार करण्यात येत आहे. परदेशातून येणाऱ्या प्रतिनिधींचे स्वागत पारंपरिक वाद्याने करण्यात येईल. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव परदेशी पाहुण्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मर्दानी खेळ, पोवाडा, नृत्य आदी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.