राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 14 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी आज सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये विविध श्रेणीत राज्याला राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती यांनी सन्मानित केले.
येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागातर्फे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह, केंद्रीय राज्य मंत्री कृष्ण पाल, सचिव आलोककुमार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार विविध श्रेणीत आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यातील काही पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले, तर काही पुरस्कारांचे वितरण केंद्रीय ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते झाले. चित्रकला स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कारार्थींना स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ऊर्जा संवर्धनात लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनातील इमारत या श्रेणीत लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड आणि डॉ. ललित ठाकरे, नोडल अधिकारी यांनी स्वीकारला. या श्रेणीतील द्वितीय पुरस्कार अहमदनगर येथील लोकपंचायत ग्रामीण तांत्रिक प्रशिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला.
ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोच्या वतीने ऊर्जेचा वापर कमी करून ऊर्जा बचत करणाऱ्या शासकीय संस्था, महाविद्यालय, औद्योगिक एकके, संस्था आणि आस्थापना यांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
कोल्हापूरच्या सौंदर्या पाटीलला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक
कोल्हापूरच्या हिराराम गर्ल्स हायस्कूलची नववीत शिकणारी सौंदर्या पाटील या विद्यार्थिनीने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते तिचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी समाजात सातत्याने जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने 2005 पासून दरवर्षी ऊर्जा संवर्धन याविषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. शालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाते.
नाशिक येथील किर्लोस्कर ऑईल इंजिनला उत्पादन श्रेणीतील प्रथम पुरस्कार
नाशिक येथील किर्लोस्कर ऑईल इंजिन लि. ला उत्पादन श्रेणीतील प्रथम पुरस्काराने राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा पुरस्कार संस्थेचे उपाध्यक्ष विनोद मेनन आणि प्लांट प्रमुख परेशकुमार जोशी यांनी स्वीकारला.
रेफ्रिजरेटर श्रेणीत पुणे येथील हेयर या खासगी कपंनीला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराने गौरविण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष एन. एस. सतीश आणि पंकज चावला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सिलिंग फॅन या श्रेणीत एटोम्बर्ग या पुणे येथील कंपनीला राष्ट्रपतींनी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराने सन्मानित केले. मनोज मीना आणि श्री दास यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
उद्योग विभागातील ग्राहकोपयोगी वस्तू श्रेणीमध्ये गोदरेज ॲण्ड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग को.लि., सातारा यांना केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री. सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उद्योग विभागातील ग्राहकोपयोगी वस्तू श्रेणीमध्ये गोदरजे ॲण्ड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग को.लि., सातारा यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्पादन श्रेणीमध्ये पुणे येथील टीके इलेवेटर इंडिया प्रा.लि. यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आणि मरेली मदरसन ऑटोमोटिव्ह लाइटिंग इंडिया प्रा.लि. यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, आयुध निर्माण श्रेणीमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी, अंबाझरी, नागपूर यांनाही प्रमाणपत्र देऊन केंद्रीय ऊर्जा मंत्री यांनी गौरविले. तसेच उद्योग विभागातील अप्रवर्तक श्रेणीमध्ये नागपूर येथील कॅल्डेरीस इंडिया रिफ्रॅक्टरीज लि. यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर साधने विभागातील ट्रान्सफॉर्मर श्रेणीमध्ये शिर्डी साई इलेक्ट्रीकल्स लि. (Model No: SSEL 25 5S) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
‘ईव्ही-यात्रा पोर्टल’ आणि मोबाईल अॅपचा शुभारंभ
वाहनातील नेव्हिगेशन यंत्रणा जवळच्या सार्वजनिक ईव्ही – इलेक्ट्रॉनिक वेहिकल चार्जर विषयी माहिती देऊ शकेल अशा प्रकारचे एक मोबाइल ऍप्लिकेशन ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोने विकसित केले आहे. देशातील ई-मोबिलिटीला चालना देण्यासाठी केंद्रीय आणि राज्य-स्तरीय विविध उपक्रमांची माहिती देणारे संकेतस्थळ आणि सीपीओना त्यांचे चार्जिंग तपशील राष्ट्रीय ऑनलाइन डेटाबेसमध्ये सुरक्षितपणे नोंदणी करण्यास सक्षम करण्यासाठी वेब-पोर्टल विकसित केले आहे.
इलेक्ट्रॉनिक व्हेईकल चार्जरविषयी माहिती देऊ शकेल अशा प्रकारचे EV यात्रा हे एक मोबाइल ऍप्लिकेशन डिझाइन आणि विकसित केले गेले आहे. हे मोबाईल ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअर वरून आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही स्मार्टफोनवर सहजपणे डाउनलोड केले जाऊ शकते आणि सोयीस्करपणे इन्स्टॉल केले जाऊ शकते. आज या ॲपचा शुभारंभ राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला.
००००
अंजु निमसरकर /वि.वृ.क्र.195 /दि.14.12.2022