पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदराच्या सर्वंकष विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.

0 16

मुंबई, दि. 12 : पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदराच्या सर्वंकष विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. तसेच पालघर येथे वादळवारा निवारा केंद्रही शीघ्र गतीने उभारावे असे निर्देशही त्यांनी प्रशासनास दिले आहेत.

            सातपाटी बंदरातील मच्छिमारांच्या समस्यांसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

            या बैठकीस खासदार राजेंद्र गावित, माजी खासदार, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि मच्छिमार प्रतिनिधी उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ.अतुल पाटणे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमित सैनी यांच्यासह अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सातपाटीच्या मच्छिमारांच्या समवेत आपण ठामपणे उभे आहोत. बंदरातील गाळाच्या समस्येवर विस्तृत चर्चेअंती प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या आहेत. सातपाटी बंदरात वादळवारा निवारा केंद्रही तातडीने निर्माण करावे. येत्या पावसाळ्यात वादळवारा निवारा केंद्राच्या अभावी एकही जीवितहानी होऊ नये, अशी खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

            यावेळी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण सुविधा, शाळांमधून मत्स्यव्यवसायाचे प्रशिक्षण, डिझेल परताव्याची थकबाकी, या भागात अत्याधुनिक सोयींनी युक्त मासळी बाजाराचा प्रलंबित प्रस्ताव अशा विविध विषयांवर चर्चा झाली. या सर्व विषयांवर मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी योग्य ते निर्देश प्रशासनास दिले असून डिझेल परताव्याची थकबाकी तातडीने वितरित करण्यासंदर्भात वित्त विभागालाही सूचना केल्या आहेत.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.