शहीद जवानांविषयी नेहमीच आदराची भावना; माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील -पालकमंत्री शंभूराज देसाई

0 14

सातारा, दि. 12: शहीद जवानांविषयी नेहमीच आदराची भावना मनामध्ये आहे. माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत बैठक बोलावण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

रेठरे बुद्रुक येथील शहीद जवान सचिन बावडेकर यांच्या हुतात्मा दिनानिमित्त आयोजित मानवंदना कार्यक्रमात पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व माजी खासदार सुधीर सावंत, १९ महाराष्ट्र बटालियनचे सी. ओ. दिनेशकुमार झा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, गट विकास अधिकारी मिना साळुंखे आदी उपस्थित होते.

देश रक्षणाच्या कर्तव्य भावनेतून सैनिक सीमेवर लढत असतात. त्यांच्याविषयी नेहमीच नतमस्तक व्हावे असे बोलून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, सैनिकांविषयी सरकार नेहमीच संवेदनशिल आहे. माजी सैनिकांना शिक्षण संस्थांमध्ये पी. टी. शिक्षक म्हणून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच सातारा पोलिस मुख्यालय येथे जिल्ह्यातील सर्व शहीद सैनिकांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. शहिदांच्या कुटुंबीयांसाठी व आजी, माजी सैनिकांसाठी शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.

माजी खासदार श्री. सावंत यांनी या वेळी सैनिक फेडरेशनच्या कामाची माहिती दिली. तसेच माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.

सुरुवातीस मान्यवरांनी शहीद सचिन बावडेकर यांच्या स्मारकास पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. यावेळी  आजी, माजी सैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.