मोतीबिंदू दूर करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि.9 : मोतीबिंदू ही एक मोठी समस्या असून या नेत्र आजारावर काम करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. केवळ सरकारच्या भरवशावर ही मोहीम पूर्ण होणार नसून यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि खाजगी रुग्णालयाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे बोलताना म्हणाले.
माधव नेत्रालय आणि वास्तूशांती पूजन व मंगल प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन आज वासुदेव नगर मेट्रो स्टेशन जवळ करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, स्वामी सवितानंद महाराज, सोलार इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष सत्यनारायणजी नुवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
मोतिबिंदू ही एक मोठी नेत्रसमस्या आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने यावर काम सुरू आहे. मुख्यमंत्री असताना २०१६-१७ मध्ये मोहीम हाती घेण्यात आली. सुमारे १४ लाख नागरिकांना शस्त्रक्रिया केल्या नसत्या तर अंधत्व आले असते. २०१९ पर्यंत सर्व ज्ञात रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. मात्र, गेल्या दीड-दोन वर्षात हे काम ठप्प झाले. आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर राज्यात मोतिबिंदूचे रुग्ण पहायला मिळत आहे. त्यामुळे ही मोहीम पुन्हा राबविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
गेल्या दोन दशकाहून अधिक काळापासून माधव नेत्रपेढीच्या माध्यमातून नेत्रचिकित्सेचे कार्य अतिशय चांगले सुरू आहे. लोकांना प्रेरित करीत ,नेत्रदानाचा उपक्रम राबवून सर्व प्रकारच्या चिकित्सांची व्यवस्था उभी करण्याचे काम सुरू आहे. यातून माधव नेत्रपेढीसारखी आधुनिक उभी राहिली आहे. शहर, ग्रामीण अशा सर्वच भागातील लोकांना अतिशय चांगली सेवा देण्याचा निर्धार माधव नेत्रपेढीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रातील लोकात काम करणा-या लोकांचा सेवाभावी वृत्तीतून कार्ये उभी राहिली पाहिजे. यातून समाजात चांगले काम उभे राहिले पाहिजे , चळवळ उभी राहिली पाहिजे. सामान्य माणसे एकत्र येत असामान्य काम करीत असतात. वयोश्री या केंद्र शासनाच्या योजनेचा नेत्ररुग्णांना फायदेशीर ठरत असल्याचे उपमुख्यमंत्री बोलता पुढे म्हणाले.
******