महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ९ जुलै २०२२ व दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट – ब मुख्य परीक्षा २०२१ या परीक्षेतील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या एकूण १०० पदांचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मुळ प्रमाणपत्रांवरुन तपासण्याच्या अधीन राहुन दिनांक ६ डिसेंबर, २०२२ रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
परीक्षेमध्ये जळगाव जिल्ह्यातील विशाल सुनिल चौधरी हे राज्यात व मागास वर्गवारीतून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून सातारा जिल्ह्यातील शीतल प्रभाकर फाळके राज्यात प्रथम आल्या आहेत.
उमेदवारांच्या माहितीसाठी या परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
राजू धोत्रे/विसंअ/