सुरगाणा तालुक्यात सीमावर्ती भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार – महासंवाद

0 14

नाशिक, दि. डिसेंबर : सामाजिक न्यायाचा व विकासाचा महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला असून त्यासाठी राज्याचा देशभरात नावलौकीक आहे. त्यामुळे सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेवरील आदिवासी गाव-पाड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने नियोजन करून त्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल, असा दिलासादायक विश्वास पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे.

सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमावर्तीत भागातील आंदोलनासंदर्भात जिल्हा प्रशासन व आंदोलकांसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी.पी. सोनवणे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी व आंदोलक समितीचे मुख्य चिंतामण गावित यांच्यासोबत आंदोलक आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले, गुजरात राज्याच्या सीमेवरील काही गाव-पाड्यांनी जे आंदोलन विविध मागण्यांचे अनुषंगाने सुरू केले आहे, त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी ते सकारात्मक घेऊन आंदोलनकर्त्यांचे सर्व प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. ज्या-ज्या विभागांशी संबंधित विषय या आंदोलनाच्या संदर्भाने समोर आले आहेत ते सर्व  विषय संबंधित विभागांनी प्राधान्यक्रमाने सोडवावेत. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासणार नाही. तसेच आदिवासी-दुर्गम भागात नियुक्त अधिकाऱ्यांनी मुख्यालयी हजर राहणे बंधनकारक असून गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तसेच पांदर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्याचे निर्देश देताना उंबरठाण येथील ग्रामीण रूग्णालयाच्या निर्मितीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीसाठी तात्काळ शासनस्तरावर निर्णय होण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

रोजगार हमीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळींवर रोजगार निर्माण करून परराज्यात मजूरांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी १५ दिवसात कृती आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामे सुरू करण्यात यावीत. त्याचबरोबर या भागात उद्योग येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील. दळणवळण वृद्धीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून गावांची कनेक्टिविटी वाढविण्यात यावी. जास्त दळणवळण असलेल्या बर्डीपाडा, राज्य महामार्ग २२ च्या बाबतीत माननीय न्यायालयास वस्तुस्थिती लक्षात आणून देऊन कामे सुरू करावित. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दळणवळणासाठी शाळेच्या वेळेनुसार मुक्कामी असणाऱ्या बसेसची सुविधा येणाऱ्या काही दिवसात सुरू  करून शाळांची दुरुस्ती, स्वच्छता गृह, पाण्याची व्यवस्था या बाबींसोबतच पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून त्यांना मुख्यालया थांबणे अनिवार्य करण्याच्याही सूचना मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या आहेत.

या परिसरातील मोबाईल नेटवर्कींगचीही कामे प्राधान्याने हाती घेण्यात यावीत. तसेच जलसंधारणाच्या कामांसंदर्भात वन विभाग व जलसंधारण विभागाने स्वंतंत्र बैठक घ्यावी. ४२ पाझर तलावांच्या कामांचा आराखडा तयार करुन त्यासाठी आवश्यक निधीचीही तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले, सीमावर्ती भागातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून पेसा, १५ वा वित्त आयोग, जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मूलभूत सुविधेची विविध कामे प्राधान्याने करण्यात येतील.

आंदोलन घेतले मागे

या बैठकीत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा प्रशासनासोबत आंदोलन कर्त्यांशी सकारात्मक केलेल्या चर्चेनंतर आंदोलकांच्या वतीने चिंतामण गावित यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा यावेळी केली.

00000000000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.