इतर राज्यांनी अनुकरण करावे असे सर्वंकष व उत्तम सांस्कृतिक धोरण तयार करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0 11

मुंबई, दि. ५:  राज्याचे नवीन प्रस्तावित सांस्कृतिक धोरण सर्वंकष असेल आणि इतर राज्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचे अनुकरण करतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, गिरीष प्रभुणे, नामदेव कांबळे, सुहास बहुळकर, कौशल इनामदार, जगन्नाथ हिलीम, सोनू दादा म्हसे या अशासकीय सदस्यांसह संस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय आणि समितीचे इतर सदस्य तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, नवीन सांस्कृतिक धोरण तयार करताना कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येईल. नवीन धोरण बनवत असताना विविध उपसमित्या तयार करून सदर समिती या धोरणामध्ये नेमक्या कोणत्या बाबी असायला हव्यात याचा अभ्यास करेल. त्याचबरोबर नागरिकांकडूनही लेखी स्वरूपात सूचना मागवण्यात येतील.

आज मराठी भाषिक केवळ महाराष्ट्रातच नाही तर दक्षिणेत तंजावर पासून ते पंजाब ते पानिपतपर्यंत तर पूर्वेला ओरिसा बंगाल पासून इंदौर, ग्वाल्हेर, सुरत, अमदाबाद, दिल्ली येथे सर्व ठिकाणी आहेत. त्या ठिकाणांची मराठी संस्कृती कशी आहे याचाही अभ्यास हे नवीन सांस्कृतिक धोरण तयार करताना करण्यात यावा. येणाऱ्या काळात दर महिन्यात सांस्कृतिक धोरणाबाबत बैठक घेण्यात येईल, असे सांस्कृतिक मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

येत्या १५ दिवसात उपसमित्या तयार करण्यात येणार

नव्याने तयार करण्यात येणारे सांस्कृतिक धोरण परिपूर्ण असण्यासाठी विविध माध्यमांतून या धोरणावर सूचना मागिवणे आवश्यक आहे. मराठी भाषा/साहित्य/ वाचन, ललित कला, संगीत आणि रंगभूमी कला, मराठी चित्रपट, लोककला, गडकिल्ले आणि संग्रहालय, महाराष्ट्रातील कारिगर वर्ग अशा सात वेगवेगळ्या विषयात उपसमित्या तयार करण्यात येणार असल्याचे श्री. सहस्त्रबुद्धे यावेळी म्हणाले. नवीन सांस्कृतिक धोरण सर्वंकष आणि सर्वसमावेशक असावे आणि ते कालबद्ध मर्यादेत तयार व्हावे यासाठी समिती प्रतिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

0000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.