‘शासन आपल्या दारी’ सारख्या शिबिरातून होतेय वंचितांची सेवा – उद्योगमंत्री उदय सामंत – महासंवाद
नाशिक, दिनांक 04 (जि.मा.का. वृत्तसेवा): नागरिकांना व विद्यार्थ्यांना विविध कामांसाठीचे लागणारे आवश्यक दाखले व सेवा एकाच छताखाली ‘शासन आपल्या दारी’ शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. या कामांसाठी त्यांना लागणारे परिश्रम व वेळ वाचून खऱ्या अर्थाने ही वंचितांची सेवा घडतेय, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
आज नाशिक तहसिल कार्यालयाच्या वतीने शिंदे गावात महाराजस्व अभियांनांतर्गत ‘शासन आपल्या दारी’आयोजित शिबिरात मंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, सहायक जिल्हाधिकारी जतीन रहेमान, तहसलिदार अनिल दौंडे, तालुका गटविकास अधिकारी सारिका बारी, कृषी अधिकारी रवींद्र वाघ, शिंदे गावाचे सरपंच गोरख जाधव, उपसरपंच अनिता तुंगार यांच्यासह महसूल विभागाचे व विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, नागरिक व विद्यार्थी यांना शैक्षणिक दाखले, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, आधिवास प्रमाणपत्र, पॅनकार्ड असे अनेक दाखले व सेवा प्राप्त करून घेण्यासाठी विविध कार्यालयांना जावे लागते व अंनत अडचणी येत असतात. परंतु आज या आयोजित शिबीरीच्या माध्यमातून सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व अधिकारी येथे उपस्थित आहेत व जागेवरच सर्व सेवा व सुविधा नागरिकांना मिळणार आहे. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आज रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक बेरोजगार युवक-युवतींना नियुक्तीपत्र देण्यात आहे आहेत. असे उपक्रम राज्यभर राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
तळागाळातील जनतेपर्यंत सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री दादाजी भुसे
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आज आयोजित केलेला ‘शासन आपल्या दारी’हे शिबिर हा त्याचाच एक भाग आहे. खेड्यापाड्यातील नागरिकांना माहितीच्या अभावी वारंवार विविध कार्यालयांना येजा करावी लागते. बऱ्याचदा आवश्यक कागदपत्र त्यांच्याकडे नसतात.त्यामुळे शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणाच आपल्या घरा-दारार्यंत उपस्थित झालेली आहे. यथे सर्व प्रकारचे दाखले व कार्डस नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हा उपक्रम जानेवारीपासून नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातून हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली.
खासदार हेमंत गोडसे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसलिदार अनिल दौंडे यांनी केले.
000000000